श्रीरामपूर : रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बॅंकेची होणारी निवडणूक लढविण्याचा निर्णय रयत सेवक विकास आघाडीने घेतला आहे. आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बेलापूर रस्त्यावरील अनमोल लॉन्स येथे बैठक पार पडली. यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष चांगदेव कडू, विठ्ठल बोरुडे, वाय. जी. वाबळे, संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब गांगर्डे, उपाध्यक्ष शाहूराव औटी, सचिव जयवंत ठाकरे, सहसचिव कैलास खैरनार, खजिनदार, सुनील अण्णासाहेब बनकर आदी उपस्थित होते.
रयत बँकेच्या संचालक मंडळाची मुदत जून २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनामुळे निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे संचालक मंडळालाही मुदतवाढ मिळाली.
आता राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
नव्याने स्थापन झालेली रयत सेवक विकास आघाडी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. यापूर्वी दोन वेळा बॅंकेची निवडणूक बिनविरोध पार पडली. मात्र यावेळी सभासदांच्या हिताकरिता संघटना पूर्ण ताकदीने निवडणूक लढविणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
समायोजित शिक्षकांना बॅंकेचे सभासदत्व देणे, सभासदांना त्यांच्या हक्काचा लाभांश मिळवून देणे, सभासदांच्या पाल्यांकरिता माफक दरात शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात याव्या या संघटनेच्या प्रमुख मागण्या आहेत, असे गांगर्डे यावेळी म्हणाले.
यावेळी आळकुटी (ता. पारनेर) येथे निधन पावलेल्या संजय चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मेळाव्यास मुख्याध्यापक रमेश वेताळ, दिलीप बनकर, पी.बी.सोनुने, आर. ए. गायधने, यु. ए. कुताळ, व्ही. एस. बारस्कर, राजेंद्र गायकवाड, आर. ए. गायधने, डी. एस. मुरूमकर, कैलास खैरनार, ए. पी. पाडवी, किरण पवार आदी उपस्थित होते.