औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे. परंतु चौरंगी लढतीमुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराला कमी मताधिक्य मिळाल्यास पुनर्मतमोजणीची मागणी होणार की काय, याची धास्ती प्रशासनाला पडली आहे. २० हजारांच्या पुढेच विजयी उमेदवाराचे मताधिक्य असेल, असा अंदाज बांधून प्रशासनातील अधिकारी स्वत:च्या मनाला दिलासा देऊ लागले आहेत.
अटीतटीच्या लढाईमुळे विजयी उमेदवाराबाबत कुणालाही अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे प्रशासनाला पुनर्मतमोजणीची गरज पडेल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे. अशी वेळ आली तर प्रशासनाची तारांबळ उडणार आहे. कमी मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन:मतमोजणीचा धाक आत्ताच पडला आहे. पुन:मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट असे संकेत नाहीत. दोन उमेदवारांमध्ये असलेल्या मतांमधील फरकाचा विचार करून निवडणूक निरीक्षक याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात.
औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील २३ उमेदवारांसाठी मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे, काँग्रेस आघाडीचे आ. सुभाष झांबड, एमआयएम वंचित बहुजन आघाडीचे आ. इम्तियाज जलील व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत झाली आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने विजयाचा दावा करणारी आकडेमोड करून सध्या निकालाची वाट पाहत आहेत. औरंगाबाद लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांत १८ लाख ८४ हजार ८६६ पैकी ११ लाख ९५ हजार २४२ (६३.४१ टक्के ) मतदान झाले आहे.
...तरच डिपॉझिट वाचेलऔरंगाबाद लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांत १८ लाख ८४ हजार ८६६ पैकी ११ लाख ९५ हजार २४२ (६३.४१ टक्के ) मतदान झाले असून, एकूण मतांपैकी १६ टक्के मतदान घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.