शहरातील मुख्य रस्त्यावर रामनवमी, राखी पौर्णिमा, गणेशोत्सव तसेच दिवाळीकरिता मूर्ती, वस्तू व खेळण्यांचे स्टॉल उभारले जातात. त्यासाठी पालिकेकडून चौरस फुटाप्रमाणे दर आकारणी करून जागावाटप केले जाते.
यातील दिवाळीतील स्टॉलवाटपाबाबत भाजपचे कार्यकर्ते अमित मुथ्था यांनी काही आक्षेप नोंदविले होते. मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी दाद मागितली होती. स्टॉलधारकांची संख्या, पावत्यांची संख्या व वसूल रकमेच्या तपशिलावर मुथ्था यांना आक्षेप होता. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाने यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला असता तो सादर करण्यात आला होता. शहरातील नागरिक सुरेश कांगुणे यांच्या नावावर २४ स्टॉल दाखविण्यात आले. प्रत्यक्षात कांगुणे यांनी स्टॉलसाठी पालिकेकडे कोणताही अर्ज केलेला नव्हता. कांगुणे यांनी ही बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या प्रकारावर मुख्याधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात काहीही नमूद नसल्याचे लांघी यांनी म्हटले आहे.