श्रीरामपूर शिवसेनेत बंडाळी; कांबळे यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:43 PM2019-09-02T14:43:35+5:302019-09-02T14:44:51+5:30
शिवसेनेत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम मानला जात असला तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मात्र अंतर्गत कलह उफाळून आला आहे.
श्रीरामपूर : काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यास शिवसेनेतूनच जोरदार विरोध सुरू झाला आहे. मतदारसंघातील अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रसंगी पदाचे राजीनामे देण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे यातील काही पदाधिकारी हे खासदार सदाशिव लोखंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवसेनेत कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम मानला जात असला तरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मात्र अंतर्गत कलह उफाळून आला आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. खासदार सदाशिव लोखंडे यांची पत्रकार परिषद असल्याचे निरोप देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात लोखंडे हे गैरहजर राहिले. त्यांच्या गैरहजेरीत उप जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, सचिन कोते, प्रदीप वाघ, राजेश तांबे, शरद भणगे, आबासाहेब बडाख, निखिल पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उपजिल्हा प्रमुख देवकर यांनी भाऊसाहेब कांबळे यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध दर्शविला. कांबळे यांच्या पक्षप्रवेशाचे आपण स्वागत करतो. पक्ष विस्तारासाठी ते गरजेचे आहे. मात्र मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे साहित्यिक लहू कानडे, डॉ.चेतन लोखंडे, रामचंद्र जाधव यांच्यासारखे अनेक सक्षम उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे कांबळेंसारख्या आयात उमेदवाराची आवश्यकता नाही. त्यामुळे पक्षाला त्याचा मोठा फटका बसेल असा इशारा यावेळी देवकर यांनी दिला.
कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काही स्थानिक पदाधिका-यांनी दिशाभूल केली. शहर प्रमुख सचिन बडधे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी चुकीची माहिती दिली. संघटनेला कुठेही विश्वासात घेतले नाही. अशा पदाधिका-यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी देवकर यांनी केली.
आमदार कांबळे यांनी यापूर्वी दिवंगत नेते जयंत ससाणे, मंत्री राधाकृष्ण विखे तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांच्याशी गद्दारी केली. त्यामुळे शिवसेनेतील सामान्य कार्यकर्त्यांचा ते कधीही विश्वासघात करतील अशी भिती देवकर यांनी व्यक्त केली.
दरम्यान, तालुका प्रमुख दादासाहेब कोकणे यांनी आपण स्वत: उद्धव ठाकरे यांच्याकडे डॉ.चेतन लोखंडे यांच्या उमेदवारीची मागणी केल्याचे सांगितले. कांबळे यांच्या उमेदवारीला माझा विरोध आहे. मात्र पदाचा राजीनामा देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मातोश्रीवर भेट घेऊन काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाऊसाहेब कांबळे हे प्रचाराला लागले आहेत. सोमवारी त्यांनी मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसेनेची उमेदवारी आपल्यालाच असल्याचा त्यांचा दावा आहे.
दुसरीकडे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, खासदार सदाशिव लोखंडे, तसेच जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी अद्याप कांबळे यांच्या पक्षप्रवेश व संभाव्य उमेदवारीवर कुठलेही भाष्य केलेले नाही.
दहा हजार शिवसैैनिक विरोध करणार
शिवसेना पदाधिकारी हे कांबळे यांच्या पक्ष प्रवेशाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.५) उद्धव ठाकरे यांना दहा हजार शिवसैैनिकांच्या सह्यांचे पत्र देत उमेदवारीला विरोध करणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच पक्षात मोठा संघर्ष उफाळून आला आहे.