अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात राज्य सरकारने गुरूवारपर्यंत एकही रुपयाही जमा केला नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या या खात्यात अजून तरी खडखडाटच आहे.राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील ५६ शेतकरी जोडप्यांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, महापौर सुरेखा कदम यांच्याहस्ते कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्ह्यातील या शेतक-यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देऊन आठ दिवस झाले आहेत. पण अजूनही कर्जमाफीस पात्र झालेल्या शेतक-यांच्या हिरव्या, पिवळ्या, लाल (ग्रीन, यलो, रेड लिस्ट) याद्याच कुठे झळकलेल्या नाहीत. एवढेच नाही तर पालकमंत्री व खासदारांनी जाहीरपणे हे शेतकरी कर्जमुक्त झाले असून हे प्रमाणपत्र दाखविताच तुम्हाला तुमच्या गावची सोसायटी लगेच रब्बी हंगामासाठी कर्ज देणार असल्याचे भाषण ठोकले होते. पण आता पालकमंत्री तसेच खासदार, आमदारांच्या हस्ते ज्या शेतक-यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली आहेत, त्या शेतक-यांची नावेच सरकारच्या कोणत्याही यादीत आलेली नाहीत. त्यामुळे या शेतक-यांसोबतच त्यांना दिलेल्या प्रमाणपत्रांचे भवितव्यदेखील धोक्यात आले आहे.जिल्हा सहकारी बँकेने गाव पातळीवर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतक-यांना कर्जवाटप केलेले आहे. यातील पात्र शेतक-यांचे खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक अशा सर्व माहितीसह याद्या तयार आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या यातील शेतक-यांच्या प्रस्तावांची सहकार खात्याच्या लेखापरीक्षकांनी तपासणी देखील केलेली आहे. जिल्हा बँकेच्या पात्र कर्जदार शेतक-यांना कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यासाठी जिल्हा बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. पण शेतक-यांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देऊन आठ दिवस झाल्यानंतरही या खात्यात राज्य सरकारने कर्जमाफीचे पैसे वर्ग केले नाहीत. त्यामुळे या खात्यात खडखडाटच आहे. या खात्यातच खडखडाट असल्याने १८ आॅक्टोबरला मोठ्या दिमाखात व तेवढ्याच घाईघाईने आयोजित केलेल्या कर्जमुक्ती प्रारंभ सोहळ्यात कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिलेल्या एकाही शेतक-याच्या बँकेतील कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे या बळीराजाची कर्जमाफी प्रत्यक्षात अवतरलेली नाही.
खात्यात पैसे नाहीतराज्य सरकारकडून जिल्हा बँकेस मिळणारी कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी बँकेत नव्याने स्वतंत्र खाते उघडण्यात आलेले आहे. पण त्यात पैसे जमा झालेले नाहीत.-रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अहमदनगर जिल्हा बँक.
पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते लक्ष्मी पूजनाच्या आदल्या दिवशी कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळालंय. त्याला आठ दिवस झालेत. पण अजूनपर्यंत कर्ज खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले नाहीत. सरकारचा अजून मेळ बसना गेलाय. आठ दिवसात कुणाचा काही निरोप न्हायी. कर्ज खात्यात पैसे जमा झाले की सांगू, म्हणलेत साहेब.-दत्तात्रय शेळके, चौंडी सेवा संस्थेचे कर्जदार.