औताडे म्हणाले, पोहेगाव महसुली मंडल गाव असून, जिल्ह्यात विकासाच्या बाबतीत नावाजलेली मोठी ग्रामपंचायत आहे. गावची लोकसंख्या दहा हजारांच्या वरती आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील २० ते २५ गावांचा दैनंदिन संबंध येतो. प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, जुनिअर कॉलेज तसेच इंग्लिश मीडियम स्कूल गावात असल्याने गावाबरोबरच बाहेरील विद्यार्थीही येथे शिक्षण घेतात. तालुक्याच्या ठिकाणी मुलांना विशेषत: मुलींना प्रवासात होणाऱ्या त्रासामुळे पालक महाविद्यालयात पाठविण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे पोहेगाव परिसरातील विद्यार्थी - विद्यार्थिनींची उच्च शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत होती. परिसरातील विद्यार्थ्यांना पोहेगाव येथे उच्च शिक्षण मिळण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील होतो. महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी ३१ ऑगस्ट २०२१ रोजी पोहेगाव येथे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास अंतिम मान्यता दिली आहे. लवकरच विद्यार्थी प्रवेशासाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या शिष्यवृत्त्यांचा पूर्ण लाभ मिळणार आहे. परिसरातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन औताडे यांनी केले आहे.
(वा. प्र.)