घोडेगाव : नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली. तब्बल ६१ हजार ४९८ गोणी कांद्याची आवक झाली. कांदा घेऊन येणाºया वाहनांची एक किमीपर्यंत रांग लागली होती. येथील एक नंबरच्या कांद्याला साडेचार हजार प्रतिक्विंटल भाव मिळाला.
मंंगळवार सकाळपासूनच घोडेगाव बाजारात छोटी-मोठी वाहने कांदा घेऊन येत होती. रात्री उशिरापर्यंत आवक सुरू होती. अचानक कांदा घेऊन येणाºया वाहनांची संख्या वाढल्याने बाजार समितीबाहेर एक किमीपर्यंत रांग लागली होती. त्यामुळे बाजार समिती प्रशासन, पोलिसांची धांदल उडाली होती. लिलावाच्या दिवशी बुधवारी सकाळीही कांदा घेऊन येणाºया वाहनांची गर्दी होती. सकाळी साडेसातलाच नगर-औरंगाबाद रस्त्यावर कांदा गोणी घेऊन आलेल्या वाहनांची अर्धा किमी रांग लागली होती.
सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेला लिलाव रात्री साडेसात ते आठपर्यंत सुरू होता. एक नंबर कांद्याला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रूपये, दोन नंबर कांद्याला दोन हजार ते साडेतीन हजार रूपये, तीन नंबरला पाचशे ते एक हजार नऊशे रूपये भाव मिळाला. बाजार आवारात राडारोडा...बाजार समितीमध्ये पावसाने दलदल निर्माण झाली. त्यामुळे कांदा केवळ शेडमध्येच उतरवून घ्यावा लागत होता. पावसाचा भरवसा नसल्याने बाहेर माल उतरवणे आडत्यांनी टाळले. म्हशीच्या बाजारात दोन्ही बाजूस आडत्यांनी दोन्ही बाजूला शेड बनविले आहेत. तेथे वाहनांना जाण्यासाठी रस्ते व्यवस्थित नाहीत. तेथे पाण्याचे डबके, चिखल, गाळ आहे. त्यामुळे वाहन चालकांची कसरत झाली. अखेर गोंधळ उडाल्याने बाजार समितीने ध्वनीक्षेपक लावून शेतकरी ,व्यापारी, आडते, वाहनचालकांना मार्गदर्शन केले.