शाम पुरोहितघरची हलाखीची आर्थिक परिस्थिती. शालेय जीवनापासून शेतीची आवड असलेल्या शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील हरिभाऊ रामप्रसाद मडके व त्यांचे बंधू गोकुळ रामप्रसाद मडके यांनी आपल्या शेतीत आधुनिक तंत्राचा अवलंब करून गेल्या काही वर्षापासून ऊस, डाळिंब, मोसंबी आदी फळ पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. आपल्या पारंपरिक शेती उद्योगाला आधुनिकतेची जोड देऊन मिळविलेले यश इतरांना प्रेरणादायी पद्धतीचे ठरत आहे.मडके बंधू यांनी २००९ मध्ये सुमारे ९ वर्षापूर्वी पैठण तालुक्यातील आखतवाडे येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र मोटकर यांच्याकडून मोसंबीची रोपे उपलब्ध करून आपल्या शेत जमिनीचे माती परीक्षण केले. १५ बाय १५ च्या अंतराने २ बाय २ चे खड्डे घेऊन त्यात कुजलेले शेणखत, प्रती झाड ५०० ग्राम दाणेदार, ५० ग्राम सूक्ष्मअन्नद्रव्याचे मिश्रण देवून तीनशे मोसंबीचे रोपे लावली. शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत १ कोटी ३० लाख लिटर पाणी क्षमतेचे शेततळे घेऊन ठिबकने पाणी व्यवस्थापनाचा अवलंब केला. सुमारे पाच वर्षानंतर पहिल्या वर्षी सुमारे ६ ते ७ टन पहिले उत्पन्न घेतले. पहिल्या पाच वर्षापर्यंत प्रती वर्षी मोसंबीच्या उत्पादनात झालेल्या भरीव वाढीमुळे त्यांचा उत्साह अधिक वाढला. त्यामुळे सुमारे दोन वर्षापूर्वी आणखी चारशे मोसंबीच्या रोपांची त्यांनी त्यात वाढ केली. मोसंबी बरोबरच कांदा, कपाशी आदी आंतरपिकातूनही त्यांनी शेती उद्योगात उत्तुंग भरारी घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यंदाच्या वर्षाचा आंबे बहार धरताना झाड निर्जंतुक करण्यासाठी सुरुवातीला बोर्डो मिश्रणाची फवारणी केले. एनपीके सूक्ष्म अन्नद्रव्य व शेणखत झाडाच्या मुळाभोवती टाकले. त्यानंतर ड्रिपने पहिले पाणी दिले. नंतर २५ दिवसांनी बुरशीनाशक, मायक्रोन्यूटनची फवारणी केली. त्यामुळे झाडाला कळी चांगल्या प्रकारची निघाली. त्याचा उत्पन्न वाढीस चांगला फायदा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाच्या हंगामासाठी मडके बंधू यांची मोसंबी सध्या सज्ज झाली असून मोसंबी बागेतील प्रत्येक झाडाला ८०० ते ९०० फळ लगडली आहेत. यंदाच्या हंगामात त्यांच्याकडील न्यू शेलार जातीच्या मोसंबीचे प्रती एकरी २० टन उत्पादन अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.शेतीबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग असतो. गोकुळ मडके हे गदेवाडी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत. तर हरिभाऊ मडके यांचा सामाजिक क्षेत्रात वावर आहे. एकंदरीत नोकरीच्या मागे न लागता मडके बंधूंनी कृषी क्षेत्रात घेतलेली गरुड झेप परिसरातील इतर सर्व युवा शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरली आहे.
ऊस, डाळिंब, मोसंबीचे विक्रमी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:49 PM