अहमदनगर : कर्जत, जामखेड तालुक्यात यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांनी उडदाची विक्रमी पेरणी केली आहे. दोन्ही तालुक्यात मिळवून जवळपास ५० हजार हेक्टरवर उडीद पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट पेरणी झाली झाली आहे.
खरीप हंगामात कर्जत, जामखेड तालुक्यातील शेतकरी प्राधान्याने उडीद, मूग, तूर, बाजरी अशा पिकांना प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षात उडीद पिकाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. उडीद साधारणत: एकरी पाच ते सहा क्विंटल निघतो. अडीच महिन्यात निघणारे हे पीक आहे. त्यानंतर रब्बी ज्वारी, गहू पेरणी अथवा कांदा लागवड करता येते. या भागातील शेतकरी उडीद घेतल्यानंतर साधारणत: कांद्यालाच प्राधान्य देतात. काही वेळा दुबार पेरणीचे संकट आले तरीही उडीद घेता येतो. त्यातच हभीभाव असल्याने हमखास पैसे मिळतात. त्यामुळेही उडीद पेरणी यंदा दाेन्ही तालुक्यात वाढली असावी. कर्जत तालुक्यात २५ हजार ५२३ हेक्टर तर जामखेड तालुक्यात २२ हजार २८० हेक्टरवर उडीद पेरणी झाली आहे. गतवर्षी कर्जत तालुक्यात १४ हजार हेक्टरवर तर जामखेड तालुक्यात १० हजार हेक्टरच्या आसपास उडीद पेरणी झाली होती.
---
शेतकऱ्यांची उडदालाच का पसंती?
कमी खर्च, अल्पावधीत पैसे मिळवून देणारे पीक, योग्य हमीभाव, ६५ ते ७५ दिवसात निघते, त्यानंतर रब्बी ज्वारी, कांदा घेणे सहज शक्य, पाणी कमी लागते, केवळ पावसावरही येते.
----
यामुळे झाली विक्रमी पेरणी..
१५ जून अगोदर चांगला पाऊस झाल्यास कर्जत तालुक्यातील शेतकरी उडीद पिकालाच प्राधान्य देतात. यंदा पाऊसही वेळेत आला. या पिकाला हभीभाव असून गेल्या वर्षी हभीभाव खरेदी केंद्रही सुरू झाले होते. प्रतिक्विंटल सहा हजार भाव होता. मात्र शेवटच्या टप्प्यात प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांपर्यंत भाव गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले होते. कदाचित त्यामुळेही यंदा उडदाची विक्रमी पेरणी झाली, असावी असे तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी सांगितले.