नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते आदींनी या शिबिराला भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. कोरोनामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवजयंती उत्सव युवक समितीच्या सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यंदा तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त संगमनेर शहर तसेच तालुक्यातील काही गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय झाला होता.
प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत अर्पण व आधार या दोन रक्त पेढ्यांच्या माध्यमातून समितीने शिबिराचे आयोजन केले होते. शहरातील रंगारगल्ली परिसरातील मंदिरांमध्ये तसेच तालुक्यातील कासारा दुमाला, पेमगिरी, सुकेवाडी या गावांतील हनुमान मंदिरांमध्ये एकाच दिवशी रक्तदान शिबिर घेण्यात आले. तरुण, तरुणी, युवक, युवती, महिला, पुरुष अशा एकूण ८१२ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.