लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कोपरगाव तालुक्यातील १ हजार ४१६ अपात्र लाभार्थींच्या बँक खात्यातून १ कोटी २१ लाख रुपयांची रक्कम १२ फेब्रुवारी अखेर वसूल करण्यात आली आहे. ही वसुली मागील सप्टेंबर - ऑक्टोबर २०२० पासून सूर करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी देशातील पंतप्रधान किसान निधी योजनेअंतर्गत प्रतिवर्ष ६ हजार इतकी रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार संपूर्ण वर्षभरात दोन हजार रुपये याप्रमाणे तीन वेळा ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. परंतु, या योजनेचा लाभ घेताना काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्या निकषांनुसार जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांना हे अनुदान मिळत आहे. परंतु, निकषात बसत नसतानाही या योजनेत सहभागी होऊन लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा शासनाच्या वतीने सर्व्हे करण्यात आला.
कोपरगाव तालुक्यात एकूण ३४ हजार शेतकऱ्यांनी या योजनेत सभाग घेतला होता. त्यापैकी शासनाच्या सर्व्हेत ३ हजार ७३० शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे. या अपात्र लाभार्थींकडून २ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम पुन्हा वसूल करण्यात येणार आहे. त्यापैकी १ हजार ४१६ शेतकऱ्यांकडून १ कोटी २१ लाख वसूल करण्यात आले आहे. तर उर्वरित २ हजार ३१४ शेतकऱ्यांकडून १ कोटी २५ लाख रुपये वसूल करण्यात येणार आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांनी तालुक्यातील सर्वच बँकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. त्यामुळे अशा सर्वच अपात्र लाभार्थींनी त्यांच्या बँक खात्यात रक्कम भरल्यास त्याच खात्यातून बँकेमार्फत ही रक्कम शासनाकडे जमा होत आहे. अशा प्रकारे आतापर्यंत वरील रक्कम शासनाकडे जमा झाली आहे.
.........
या योजेनचा लाभ घेतलेल्या सर्वच अपात्र लाभार्थींनी आतापर्यंत जेवढी रक्कम या योजेतून घेतली आहे अशा सर्वच अपात्र लाभार्थींच्या खात्याला रक्कम वसुलीसाठी लिंक लावण्यात आले आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल होत आहे.
-योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव