लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या नोकरभरतीत गुणवत्ता यादीत येऊनही विशाल बहिरम या उमेदवाराला बँकेने नियुक्तपत्र न पाठविल्याने याबाबत नाशिकच्या सहकार सहनिबंधकांनी बँकेकडून खुलासा मागविला आहे. ३० जूनपर्यंत बँकेला हा खुलासा सादर करावयाचा आहे.
बहिरम या उमेदवाराने अनुसूचित जमाती प्रवर्गात ज्युनिअर आॅफिसर या पदासाठी बँकेची परीक्षा दिली होती. तो गुणवत्ता यादीत आला. मात्र, बँकेचे नियुक्तीपत्रच त्याला मिळाले नाही. याबाबत त्याने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले. मात्र, त्यानंतरही बँकेने त्याची दखल घेतली नाही. याऊलट बहिरम याला आम्ही नियुक्तीपत्र पाठविले होते मात्र, तो हजर झाला नाही, असा दावा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले आहे. बँकेने आपणाला जे नियुक्तीपत्र पाठविले त्याची पोहोच दाखवावी, असे आवाहन बहिरम याने केले आहे.
मात्र, तशी पोहोच बँक दाखवू शकलेली नाही. आम्ही साध्या टपालाने नियुक्तीपत्र पाठविले होते, असे बँकेचे म्हणणे आहे. बँकेने नियुक्ती पत्र पाठविले नाही, तसेच बँकेचे संकेतस्थळ अथवा मेलद्वारेही भरतीबाबत नंतरच्या काळात काहीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे आपण नियुक्तीला मुकलो असल्याची बहिरम याची तक्रार आहे. या तक्रारीवर बँकेने काय कार्यवाही केली हा अहवाल नाशिकच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर यांनी बँकेकडे मागितला आहे. बँकेने साध्या
--------------टपालाने नियुक्तीपत्र का पाठवले? बहिरम याला नियुक्तीपत्र पाठविल्याचा कोणता पुरावा बँक सहनिबंधकांना सादर करणार ? याबाबत उत्सुकता आहे. बहिरम याला शासनाने व बँकेने न्याय न दिल्यास अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अॅड. अरुण जाधव यांनी केलेली आहे.