राहुरी : रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांची लूट न थांबल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मोरे यांनी दिला.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राहुरी तहसील कार्यालयामध्ये कापूस उत्पादक शेतकरी व्यापारी व अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. बैठकीमध्ये रवींद्र मोरे यांनी सांगितले की, वजन काट्यामध्ये रिमोट पद्धतीने शेतकऱ्यांचे कमी वजन दाखविले जाते. याशिवाय रिकामे वाहनाचे वजन काट्यावर वजन करताना माणसाला बसवली जाते. त्यामुळे ७० किलो कापसाला घट दाखविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होते. कोणत्याही कापूस व्यापाऱ्याकडे लायसन नसल्याचे मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.
बारा प्रकारचे लायसन आहे. त्यापैकी एक प्रकारचे लायसन तरी व्यापाऱ्यांनी ठेवावे. कोणत्याही शेतकऱ्यांची लूट केल्यास आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शेख यांनी दिला.
माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आव्हान केले. शेतकरी, व्यापारी, अधिकारी यांच्यात समन्वय असण्याची गरज तनपुरे यांनी व्यक्त केली.
बैठकीस माजी खासदार प्रसाद तनपुरे, तहसीलदार एफ. आर. शेख, बाजार समितीचे प्रकाश डुकरे, वरिष्ठ लिपिक मधुकर कोळसे, वजन काटा सहाय्यक निबंधक सुनील चित्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, व्यापारी अतुल तनपुरे, सचिन दुबे, संदीप डावखर, ईश्वर सुराणा आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.