लसीकरणासाठी cowin.gov.in किंवा कोविन ॲपद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागते. रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वांत प्रथम मोबाइल नंबर नोंदवावा लागतो. या मोबाइल नंबरवर एक सहा अंकी ओटीपी येतो. हा ओटीपी नोंदवल्यानंतर आपण लसीकरणासाठी नोंदणी करता येते. ही नोंदणी करताना तुमचे ओळखपत्र, ओळखपत्राचा क्रमांक, लिंग, अशी माहिती भरल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होते. यानंतर तुम्हाला लस उपलब्ध असलेल्या आरोग्य केंद्रावर शेड्युल्ड घ्यावे लागते. मात्र, लस उपलब्ध असेल तरच हे शेड्युल्ड मिळते.
यासाठी दोन पर्याय दिले आहेत. जिल्हानिहाय अथवा पिनकोडनिहाय लस उपलब्धेतेची माहिती देत शेड्युल्ड घ्यावे लागते. अनेकदा लस उपलब्ध असल्याचे दाखवूनही शेड्युल्ड मिळत नाही. उपलब्ध असलेली लस अवघ्या तासाभरात संपते. मात्र, तरीही शेड्युल्ड मिळत नाही. त्यामुळे नागरिक हैराण होतात.
….……………
२८ तारखेपासून लसीसाठी वेट
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सरकारने २८ तारखेपासून लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. मात्र, तरीही प्रत्यक्षात लस घेण्यासाठी केंद्र मिळत नाही. लसीकरण केंद्रावरही नोंदणी केल्यानंतर शेड्युल्ड असेल तरच लस दिली जाते. त्यामुळे नेमके शेड्युल्ड कोणाला मिळते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
….………
४५ प्लसही बुक
सद्य:स्थितीत ४५ वर्षांच्या पुढील वयोगटासाठी अनेक आठवड्यांचे बुकिंग फुल झाल्याचे ॲपवर दाखवत आहेत. त्यामुळे त्यांचीही पंचाईत झाली आहे.
….…….
प्रतिक्रिया
२८ एप्रिलला ऑनलाइन नोंदणी केली आहे. मात्र, आता लसीकरणाची वेळच मिळत नाही. १ मेपासून लसीकरणाची वेळ मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. अहमदनगर शहरातील सहाही केंद्रांवर बुकिंग फुल झाल्याचे सातत्याने दाखवले जात आहे. त्यामुळे नोंदणी करूनही फायदा होत नाही.
-वैभव रायकर