लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : हिरवाईने नटलेला परिसर, अभयारण्यात मनसोक्त फिरणारे हरणांचे कळप, येथे असलेली समृद्ध निसर्ग संपदा हे पाहून आॅस्ट्रेलियातील परदेशी पाहुणे खुश झाले. ‘रेहकुरी अभयारण्य ईज ग्रेट’ असा शेरा मारून आपल्या भावना व्यक्त केल्या. मूळचे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील मात्र तीनशे वर्षापूर्वी इंग्रजांनी विजय शर्मा यांच्या आजोबांना जनावरे राखण्यासाठी चिली देशात घेऊन गेले. तेव्हापासून या कुटुंबातील एकही सदस्य भारतात आला नाही. विजय शर्मा यांच्या कुटुंबिय चिली सोडून आॅस्ट्रेलियात स्थायिक झाले. व्यवसायाने शिक्षक असलेल्या विजय शर्मा यांनी तेथे आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रशिक्षक बनले. यामाध्यमातून त्यांची मायभूमी असलेल्या भारत देशाशी संबंध आले. देशातील विविध ऐतिहासिक गोष्टींचा आॅनलाईन अभ्यास केला. यामध्ये त्यांना देशातील अनेक ठिकाणे आवडली. त्यांची पाहणी करण्यासाठी ते भारतात सहकुटुंब आले. त्यांनी रेहकुरी अभयारण्याला भेट दिली.यावेळी वनक्षेत्रपाल मनिषा भिंगे, राउंड फॉरेस्ट आॅफिसर विठ्ठल घालमे, बंगला माळी, नाना सत्रे, माळशिरस (जि. सोलापूर) तालुक्यातील नातेपुते येथील आर्ट आॅफ लिव्हिंगचे शिक्षक डॉ. रणजित फुले, मेट्रो मल्टिस्टेटचे अध्यक्ष राहुल सोनमाळी, रोटरी क्लब आॅफ कर्जत मेट्रोचे अध्यक्ष मच्छिंद्र अनारसे, सचिव विकास सातपुते, डॉ. मधुकर कोपनर, राम ढेरे, कुंडलिक कवडे, दिलीप भोज उपस्थित होते. यानंतर परदेशी पाहुण्यांचा रोटरी क्लब आॅफ कर्जत मेट्रोच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...विजय शर्मा यांनी कुटुंबियासह कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्य, कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरु गोदड महाराज, श्री क्षेत्र सिध्दटेक येथे भेटी देऊन पाहणी करुन दर्शन घेतले. कर्जत तालुक्यातील रेहकुरी अभयारण्य पाहून परदेशी पाहुणे भारावून गेले. येथील समृद्ध निसर्ग संपदा या अभयारण्यात मनसोक्त बागडणारे हरीण, काळवीट व इतर प्राणी पाहून पाहुणे खूष झाले. त्यांना वन विभागाच्या अधिका-यांनी व कर्मचारी यांनी माहिती दिली. अभयारण्यात असलेल्या टॉवरवर जाऊन त्यांनी प्राणी व पक्षी निरीक्षण केले. कर्जतच्या भेळीचा आस्वाद घेतला.
आर्ट आॅफ लिव्हिंगमुळे तीनशे वर्षानंतर मायदेशात येण्याची संधी मिळाली. येथील विविध ठिकाणे पाहून समाधान वाटले. आॅनलाईन माहितीमुळे येण्याचा मोह आवरला नाही. -विजय शर्मा, आॅस्ट्रेलिया.