अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेत बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात असला तरी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी तडजोडी करत एक प्रकारे समझोता एक्स्प्रेसचीच राजवट बँकेवर लादली आहे. त्यामुळे अध्यक्ष कुणाचाही असला तरी तो सर्वांच्या सहमतीतूनच होईल.
जिल्हा सहकारी बँकेचे १७ संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित चार जागांसाठी निवडणूक झाली. मतमोजणी होऊन रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. महाविकास आघाडीला दोन, तर भाजपाला दोन, अशा प्रत्येकी दोना जागा मिळाल्या. जिल्हा बँकेच्या संचालकांवर नजर टाकल्यास कोणत्याही एका पक्षाला बँकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करता आले नाही. महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे; परंतु भाजपाच्या मदतीने राजकीय तडजोडींतून १७ संचालकांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. काही ठिकाणी भाजपने, तर काही ठिकाणी महाविकास आघाडीने माघार घेतल्याने संचालकांनी निवडणुकीआधी गुलाल उधळला. भाजपाचे विवेक कोल्हे, आमदार मोनिका राजळे, सीताराम गायकर, ही मंडळी जरी महाविकास आघाडीसोबत असली तरी ती पक्ष म्हणून नाही, तर राजकीय तडजोडी म्हणूनच राष्ट्रवादी- थोरातांकडे आहेत; पण त्यांनी अधिकृतपणे पक्ष सोडलेला नाही; पण ही मंडळी आमची आहे, असे भाजपही छातीठोकपणे सांगू शकत नाही. कारण कोल्हे, गायकर, राजळे यांनी आतून थोरात यांच्याशी जुळवून घेतलेले आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचा अध्यक्ष एकट्या महाविकास आघाडीचा किंवा एकट्या भाजपाचा असणार नाही. बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडताना थेट भाजपाची मदत घ्यावी लागणार नाही, हे जरी खरे असले तरी संचालक मंडळ बिनविरोध करता ही मदत घेतली गेली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या कोणत्या एका पक्षाकडे नाही, तर त्यांनी केलेल्या समझोता एक्स्प्रेसच्या हाती असणार आहेत.
विखे गटाचे अमोल राळेभात यांना बिनविरोध निवडून आणण्यात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा हात आहे. स्थानिक विकासाचा मुद्दा पुढे करत पवार यांनी सुरेश भोसले यांना माघार घेण्यास सांगितले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मूळचे भाजपचे; पण ऐनवेळी त्यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची साथ सोडून राष्ट्रवादीत उडी घेतली आणि ते राष्ट्रवादीकडून संचालक झाले. तेथील भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी गायकरांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. ही एक प्रकारे गायकर यांना केलेली मदतच आहे. याशिवाय पिचड यांनी स्वत: माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे अमित भांगरे हेही बिनविरोध निवडून आले. म्हणजे अकोल्यात भाजप व राष्ट्रवादीने आपापसात केलेली ही तडजोडच आहे. भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अशुतोष काळे यांच्या गटाने माघार घेतली. त्याबदल्यात महसूलमंत्री थोरात यांनी काळे यांना शेतीपूरकमधून बिनविरोध निवडून आणले. श्रीरामपूरमध्ये करण ससाणे व भानुदास मुरकुटे यांच्यात राजकीय संघर्ष आहे; परंतु महसूलमंत्री थोरात व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय खेळी करत त्या दोघांना बिनविरोध निवडून आणले. भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांच्याविरोधात राष्ट्रावादीकडून उमेदवार दिला गेला नाही. त्यामुळे राजळे यांची निवडणूक बिनविरोध झाली. राहात्यातील अण्णासाहेब म्हस्के यांच्याविरोधात तर एकही अर्ज नव्हता. महाविकास आघाडीने विखे यांचे नातेवाईक असलेल्या म्हस्के यांच्याविरोधात उमेदवार न देऊन एक प्रकारे विखे गटाला मदतच केली. राहुरी तालुक्यात तनपुरे व कर्डिले यांच्यात मोठा राजकीय संघर्ष आहे; परंतु तिथेही कर्डिले यांनी तनपुरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. शेवगावमध्येही घुले व राजळे यांच्यात राजकीय संघर्ष आहे; परंतु राजळे यांनी चंद्रशेखर घुले यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. त्यामुळे घुले बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप व भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांच्यात टोकाचा राजकीय संघर्ष आहे; पण पाचपुते यांनी जगताप यांच्याविरोधात उमेदवार न देऊन जगताप यांचा मार्ग सुकर केला. थोरात यांनी राहत्यात म्हस्के यांना विरोध केला नाही. त्याची परतफेड विखे यांनी संगमनेरात केली. त्यामुळे कानवडे हे बिनविरोध निवडून येऊ शकले. विधानसभेला सेनेचे मंत्री शंकरराव गडाख व भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यात लढत झाली; परंतु त्यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र मुरकुटे यांनी गडाख यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. याशिवाय विठ्ठल लंघे यांनी गडाख यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता; परंतु अखेरच्या क्षणी त्यांनीही माघार घेत एक प्रकारे गडाख यांना मदतच केली. महिला राखीवमध्ये २८ अर्ज होते. विखे गटाचे दत्ता पानसरे यांनी महिला राखीवमधून पत्नीचा अर्ज दाखल केला होता; पण त्यांनी तो मागे घेतला. त्यामुळे अनुराधा नागवडे बिनविरोध निवडून आल्या. राजकीय तडजोडी करत अशा १७ संचालकांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. उर्वरित चार जागांसाठी केलेल्या तडजोडी मात्र अपयशी ठरल्याने निवडणूक लागली.
...
पुन्हा चाव्या कर्डिलेंच्या हाती
मागील पाच वर्षे जिल्हा बँकेवर माजी आमदार कर्डिले यांचेच वर्चस्व राहिले. अध्यक्ष गायकर असले तरी कर्डिले यांचीच भूमिका महत्त्वाची राहिली. इतर पदाधिकाऱ्यांनाही कर्डिले यांचेच ऐकावे लागले. यावेळीही कर्डिले निवडणूक लढवून निवडून आले. बहुतांश संचालक बिनविरोध निवडून आले. विखे- थोरात हे कर्डिले यांची निवडणूक बिनविरोध करू शकले नाहीत. याचा कर्डिले पुरेपूर सूड उगवतील. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांना कर्डिले यांना वचकून राहावे लागणार आहे. कारखान्यांची कर्जे ही काही सरळ दिली जात नसतात. त्यामुळे कर्जाच्या तडजोडी करण्यासाठी कारखानदारांना कर्डिले यांचे उंबरे झिजवावे लागणार आहेत.
....
पक्षी बलाबल
राष्ट्रवादी- ८, काँग्रेस- ४, भाजप- ७, सेना- १, स्थानिक विकास आघाडी- १