अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले. बोठेसह आणखी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. त्याला अखेर जेरबंद करण्यास पोलिसांना शनिवारी यश आले. बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे (रा. बालिकाश्रम रोड, अहमदनगर), जर्नादन अकुला चंद्राप्पा (रा. सारोमानगर, रंगारेड्डी, हैदराबाद, तेलंगणा), पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी ( रा. हैदराबाद, तेलंगणा) ( फरार), राजशेखर अंजय चाकाली ( रा. मुस्ताबाद, तेलंगणा), शेख इस्माईल शेख अली ( रा. रंगारेड्डी, तेलंगणा), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (रा. रंगारेड्डी, तेलंगणा), महेश वसंतराव तनपुरे ( नवलेनगर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर) यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.
यातील राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ या तीन आरोपींना पारनेर न्यायालयाने १४ मार्चपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे, जर्नादन अकुला चंद्रापा, महेश वसंतराव तनपुरे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी हा आरोपी फरार आहे.