अहमदनगर : केडगावमधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या अनियंत्रित होत असतानाच आता या रुग्णांना आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शन शोधूनही मिळत नाही. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक केडगावमध्ये थेट रस्त्यावर उतरले. पोलिसांनी मध्यस्थी केली तरीही रुग्णांना इंजेक्शन मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी नगर-पुणे महामार्गावरच ठिय्या मांडत संताप व्यक्त केला.
केडगावमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संपूर्ण परिसरात सध्या ५०० पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना तीन दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. वेळेत इंजेक्शन मिळत नसल्याने अनेक रुग्णांचे उपचार अर्धवट आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन मिळविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत आहेत. अनेकजण रात्रभर फिरून इंजेक्शन कुठे मिळते का, याचा शोध घेत होते. मात्र, एवढे करूनही रुग्णांना इंजेक्शन मिळू शकले नाही.
केडगावमधील अधिकृत औषध विक्रेत्यांनी रविवारी सकाळी इंजेक्शन मिळेल, असे रुग्णांच्या नातेवाइकांना सांगितल्याने मेडिकल स्टोअरमध्ये गर्दी केली. मात्र, साडेदहा वाजून गेले तरी मेडिकल न उघडल्याने नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी नगर-पुणे रस्त्यावरच ठिय्या मांडत आपला संताप व्यक्त केला. कोतवाली पोलिसांनी मध्यस्थी करीत मेडिकलचालकाला बोलवून घेतले. आमच्याकडे रात्री आलेले सर्व इंजेक्शन औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून रात्रीतूनच वाटून टाकले, असे स्पष्टीकरण मेडिकलचालकाने दिले. मात्र, रुग्णांच्या नातेवाइकांचे समाधान होत नसल्याने शेवटी कोतवाली पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी मेडिकलचालकाला आपल्या ताब्यात घेतले. मात्र, एवढे करूनही शेवटी रुग्णांच्या नातेवाइकांना इंजेक्शन न मिळाल्याने त्यांची वणवण सुरूच होती.