कोपरगाव : शासनाने कोरोना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणीची अट घातल्याने अनेकांना अडचण निर्माण झाली आहे. त्यातच १८ ते ४४ या वयोगटातील अनेक नागरिक अशिक्षित आहेत, अनेकांकडे साधे मोबाइलही नसल्याने त्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही. त्यामुळे ते लसीकरणापासून वंचित राहू शकतात. म्हणून लसीकरण केंद्रावरच नोंदणीची सोय करावी. या कामासाठी सामाजिक संस्था, व्यक्ती यांचीही मदत घेता येऊ शकते, असे मत कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केले आहे.
वहाडणे म्हणाले, सध्या लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. लोक लसीकरण करून घेण्यासाठी रांगा लावतात, उन्हामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. म्हणून टोकन पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. जेवढी लस उपलब्ध असतील तितकेच टोकन वाटप करून उरलेल्या लोकांना घरी जाऊ द्यावे. रांगेतील गर्दीमध्ये कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. रांगेत उभे रहायचे व लस संपल्यावर लस न घेताच घरी जायचे असे प्रकार टाळण्यासाठी टोकन पद्धतीचा अवलंब करावा. ४५ वर्षावरील अनेक जेष्ठ नागरिकांनाही रांगेत उभे राहण्याचा व हेलपाटे मारण्याचा त्रास होऊ नये असेच नियोजन करावे.