लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : रेड, आॅरेंज झोनमधून खेड्यात येत असलेल्या लोकांमुळे ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होत आहे. अशा लोकांना त्यांच्या स्वत:च्या घरातच क्वारंटाईन करावे. मात्र जे नागरिक ग्रीन झोनमधून इतर गावात येतात, अशा नागरिकांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची अट शिथिल करावी, अशी मागणी आदर्श हिवरेबाजारचे सरपंच तथा राज्य आदर्श गाव समितीचे सरपंच पोपटराव पवार यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनाच थेट पत्र पाठवले आहे. या पत्रात पवार यांनी म्हटले आहे की, ५ मे २०२० रोजीच्या अहमदनगरचे तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशानुसार आता शेजारील गावातून आपल्या गावात आलेल्या पाहुण्यांनासुद्धा क्वारंटाईन करण्यात येत आहे. शेजारील गावचे पाहुणे एक ते दोन दिवसांसाठी ये-जा करीत असतात. बाहेरून हॉटस्पॉट किंवा रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना त्यांच्या स्वत:च्या घरीच क्वारंटाईन करण्यात यावे. कारण सध्या शहरातून खेड्याकडे येणाºयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होवून वादविवाद वाढतील. त्यामुळे आतापर्यत सुरक्षित असलेली गावेसुद्धा असुरक्षित होऊ शकतात. ३० मे पर्यंत लॉकडाऊन शिस्तीने पाळलयास कोरोना आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल. तसेच ग्रामपंचायतीकडे अत्यावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. रेड झोनमधून आलेल्यांना प्राथमिक शाळेत ठेवण्यात येते. ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे असे वाटत नाही. मात्र ग्रीन झोनमधून आलेल्या नागरिकासाठी संस्थात्मक विलीगीकरणाचा आदेश शिथिल करण्यात यावा.