ताब्यात घेतलेल्या गायींची माउली कृपा गोशाळा येथे सुखरूप रवानगी केली. ही कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे.
वाळकी येथे तोसिफ शेख हा इसम गाई कत्तलीसाठी येणार असल्याची माहिती तालुका सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळाली. त्यानुसार वाळकीत सापळा रचून एक महिंद्रा पिकअप टेम्पो ताब्यात घेण्यात आला. त्यामध्ये गोवंश ६ जनावरे आढळून आल्याने तोसिफकडे अधिक चौकशी केली असता त्याने या गाई झेंडिगेट येथे कत्तल करण्याकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले. वाळकी धोंडेवाडी रोडवर अखिल कुरेशी याचे शेतातून ही जनावरे आणली असल्याचे सांगितले. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी त्याच्या शेताच्या बाजूस झाडाझुडपात २० गायी लपवून बांधल्याचे आढळून आले. मोसीन कुरेशी याचे वाळकी येथे प्लॉटवर दाटीवाटीने ठेवलेल्या १२ गायी आढळून आल्या. या सर्व ३८ गायी ताब्यात घेऊन माउली कृपा गोशाळा येथे पाठवण्यात आल्या आहेत. तोसिफ शेख, अखिल कुरेशी, मोसीन कुरेशी (रा. झेंडिगेट, अहमदनगर) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ लाख २८ हजार किमतीच्या गायी व ५ लाख किमतीचे पिकअप वाहन असे १६ लाख २८ हजार किमतीचा मुद्देमाल वाळकी (ता.नगर) येथून नगर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे.