या कारवाईत एकूण १६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या गाईंची माऊलीकृपा गोशाळा येथे रवानगी करण्यात आली आहे. वाळकी येथे तोसिफ शेख हा इसम कत्तलीसाठी गाई घेऊन येणार असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक राजेंद्र सानप यांना मिळाली होती. त्यानुसार वाळकी येथे सापळा रचून १ पीकअप टेम्पो ताब्यात घेण्यात आला. त्यामध्ये ६ गोवंशीय जनावरे आढळून आल्याने तोसिफ याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरच्या गाई या झेंडिगेट येथे कत्तल करण्याकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले तसेच वाळकी येथील अखिल कुरेशी याच्या शेतातून ही जनावरे आणली असल्याचे सांगितले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, उपनिरीक्षक जारवाल, राऊत, कॉन्स्टेबल अबनावे, मरकड, भालसिंग, खेडकर, पालवे, तोरडमल यांनी छापा टाकला असता कुरेशी यांच्या शेतात झाडाझुडपात २० गाई बांधल्याचे आढळून आले. तसेच मोसीन कुरेशी याचे वाळकी येथे प्लॉटवर १२ गाई आढळून आल्या. अशा एकूण ३८ गायींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तोसिफ शेख, अखिल कुरेशी, मोसीन कुरेशी (सर्व रा. झेंडिगेट, अहमदनगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कत्तलीसाठी आणलेल्या ३८ गाईंची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:21 AM