पारनेर :
तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनबाबत लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. इंजेक्शन मिळाले नाही तर आपला रूग्ण दगावेल ही भीती नागरिकांनी मनातून दूर करण्याची गरज आहे. रेमडेसिविर हा एकमेव रामबाण उपाय नाही. इंजेक्शनविनाही अनेक रूग्णांनी कोरोनावर मात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पारनेर तालुक्यातील विविध कोविड सेंटरर्सला रविवारी खा. सुजय विखे यांनी भेटी दिल्या. तेथील रूग्ण, डॉक्टर यांच्याशी त्यांनी संवाद साधला. पारनेर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विखे म्हणाले, ज्या इंजेक्शनसाठी लोक धावाधाव करीत आहेेत ते रेमडेसिविर इंजेक्शन हा रामबाण इलाज नाही. रूग्णाचे नातेवाईक ज्या तळमळीने त्याची मागणी करतील त्यांची आर्थिक लूटमार होईल. डॉक्टर या नात्याने जबाबदारीने सांगतो की, विळद येथील हॉस्पिटलसह अनेक हॉस्पिटलमध्ये २२ ते ३० वयोगटातील तरूण रेमडेसिविरचे सहा डोस देऊनही मृत्यूमुखी पडले आहेत. याउलट एकही इंजेक्शन न देता साठ वर्षे व त्यावरील वयाच्या रूग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. या आजाराचा कोणताही अंदाज बांधता येत नाही किंवा त्यावरील उपचारांची कोणतीही आचारसंहिता ठरलेली नाही. या विषाणूवर कोणते औषध काम करते याचाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे आज रेमडेसिविर उपलब्ध झाले नाही, त्यामुळे आपला रूग्ण दगावेल ही भीती मनातून दूर करा, असे आवाहन विखे यांनी केले. कोरोनापासून रूग्णांना वाचविण्यासाठी आज फक्त ऑक्सिजनची आवश्यकता आहे. त्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करीत आहेत. आरोप-प्रत्यारोप करून हा प्रश्न सुटणार नाही असेही विखे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, सभापती गणेश शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे, तहसीलदार ज्योती देवरे, सुभाष दुधाडे, तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा उंद्रे, डॉ. अभिलाशा शिंदे, नरेंद्र मुळे, शिवाजी औटी आदी उपस्थित होते.