कोपरगाव : रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री मेडिकल तथा एजन्सीमार्फत न करता थेट ग्रामीण रुग्णालयामार्फत करावी, अशी मागणी कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ढाकणे म्हणाले, सध्या देशभर कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. कोरोना रुग्णांचे नातेवाईक तथा घरचे मंडळी यांची रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी जात असताना प्रचंड लूट होत आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास व मेडिकल, एजन्सीद्वारे होणाऱ्या पिळवणुकीस सामोरे जावे लागत आहे. यावर पर्याय म्हणून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली या इंजेक्शनची विक्री होणार आहे. परंतु या इंजेक्शनची विक्री ही ठरवून दिलेल्या मेडिकल दुकाने, एजन्सीमधून न होता ती ग्रामीण रुग्णालय अथवा प्रशासकीय यंत्रणेमार्फत व्हावी, जेणेकरून नातेवाइकांना फसवणूक तसेच धावपळ होणार नाही. तसेच कोपरगावात ऑक्सिजनचा साठादेखील उपलब्ध करून द्यावा.
--