राहाता नगरपालिकेच्या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूचे अतिक्रमण, तसेच इतर प्रलंबित प्रश्न व वाढता कोविडचा संसर्ग यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत राहाता नगरपालिकेत बैठक पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, प्रांत गोविंद शिंदे तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी प्रमोद म्हस्के, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे, नगराध्यक्ष ममता पिपाडा, मुख्याधिकारी अजित निकत, डॉ. राजेंद्र पिपाडा, गटनेते विजय सदाफळ, दशरथ तुपे आदी उपस्थित होते.
राजेंद्र पिपाडा म्हणाले, राहाता शहरात सुरू असलेल्या विकासकामांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सहकार्य करावे. राहता शहरात जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू आहे. काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळे जॉगिंग ट्रॅकसाठी अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ जॉगिंग ट्रॅकच्या बाजूने असलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले, तसेच गावठाण परिसरात गार्डन विकसित करण्याचे काम दिलेले आहे. त्याठिकाणीही काही लोक जाणीवपूर्वक काम करू देत नाहीत. यासंदर्भात तात्काळ काम करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या. राहाता ग्रामीण रुग्णालयात होणारा लसीकरणाचा तुटवडा याबाबत नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांनाही विचारणा केली. राहाता नगरपालिकेचे प्रलंबित कामांना मदत करावी व विकासकामांना येणारे अडथळे दूर करावेत, अशी विनंती नगराध्यक्ष ममता पिपाडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
( ०४ पिपाडा)