पारनेर : शासनाकडून फक्त आरक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या गणवेशामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांमध्ये वेगळेपणाची निर्माण होणारी भावना ओळखून सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना एकच गणवेश तेही शासकीय खर्चातून देण्याचा अनोखा उपक्रम करून पारनेर पंचायत समितीने विद्यार्थ्यांमधील जातीभेदाच्या भिंती दूर केल्या आहेत. नगर जिल्ह्यासह राज्यातील असा हा पहिलाच उपक्रम ठरत आहे.जिल्हा परिषदेसह राज्यभरात शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती-जमाती, आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जात आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांमागे दोन ड्रेसला चारशे रुपयांचे अनुदान दिले जाते.पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी प्राथमिक शाळांना भेटी दिल्यावर विद्यार्थ्यांना शाळेत गणवेश वाटप करताना सर्व मुलींना मोफत गणवेश आहे. सर्वसामान्य पण गरजू विद्यार्थ्यांना मात्र शासनाकडून गणवेश मिळत नाही. शिवाय फक्त जाती-जमातीच्याच विद्यार्थ्यांना गणवेश दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये जातीभेदाची भावना तयार होत असल्याचे दिसून आले. त्यांनी गटशिक्षणाधिकारी के. एल. पटारे, विस्तार अधिकारी विनेश लाळगे, संभाजी झावरे यांच्यासह सर्व शिक्षक संघटनांची बैठक घेतली. यामध्ये शासनाकडून तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना येणाऱ्या गणवेशाबरोबर सर्वांनाच गणवेश देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचा आराखडा तयार करून अतिरिक्त खर्च किती होईल, याचीही माहिती काढण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
गणवेशातून जातीभेदाच्या भिंती दूर
By admin | Published: June 27, 2016 12:50 AM