श्रीरामपूर : राम मंदिर उभारणीचा अट्टाहास आणि रावण दहनाच्या परंपरेमुळे दक्षिणेतील चारही राज्ये भारतापासून कायमची तुटतील, असा गंभीर इशारा ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिला. देशात आता पूर्ण अराजक असल्याचा आरोप त्यांनी केला.महात्मा ज्योतीबा फुले तरूण मंडळाच्या वतीने येथील आझाद मैैदान येथे डॉ.कसबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.डॉ.कसबे म्हणाले, या देशात बाबरी मस्जिद विध्वंसापर्यंत कुठेही दहशतवादी कारवाया नव्हत्या. बाबरी ध्वंस ही पहिली दहशतवादी घटना आहे. आता पुन्हा अराजक पसरविले जात आहे. राम मंदिराचा नारा देण्यात आला आहे. यातून देशाचे विभाजन होण्याचा धोका आहे. दक्षिण भारतात द्रविडी, मूलनिवासींची संस्कृती आहे. ती राज्ये कायमची तुटली जाण्याचा धोका आहे.भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी बाबरी पाडण्याचे पाप केले. त्याचीच फळे ते आता भोगत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा नमस्कार स्वीकारत नाहीत. अडवाणी यांच्या दुर्दशेला तेच कारणीभूत आहेत, अशी खोचक टीका डॉ.कसबे यांनी केली. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रातून तरूणांना भडकून देण्याचे काम केले. त्यांचे लिखाण हा इतिहास नाही अशी टीका त्यांनी केली. या देशात धर्म चिकित्सा केली जात नाही. यामुळेच तो मागे राहिला. शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशावर भाजप नेते बेताल विधाने करतात यावर डॉ.कसबे यांनी खंत व्यक्त केली. प्रत्येक महापुरूषाला अनुयायांनी जातीमध्ये विभागून टाकले. आपण ब्राम्हण समाजाविरोधात बोलत नाही, तर केवळ अनिष्ट व चुकीच्या गोष्टींचा समाचार घेतो. महात्मा फुले यांनी स्त्रीयांना आत्मसन्मान दिला. ती या देशातील मोठी क्रांती होती, असे डॉ.कसबे शेवटी म्हणाले.माजी आमदार दौलतराव पवार, उपनगराध्यक्ष करण ससाणे, उद्योजक विजयराव कुदळे, कामगार नेते अविनाश आपटे, डॉ.वसंत जमधडे, पुंडलिक गिरमे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, प्राचार्य शंकरराव गागरे, पं.स सदस्या डॉ.वंदना मुरकुटे, नगरसेविका भारती कांबळे आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्तविक प्रभाकर भोंगळे यांनी केले. कार्यक्रमास मोठी उपस्थिती होती.