'त्रिपुरातील घटनेचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात नकोत'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 05:18 PM2021-11-13T17:18:21+5:302021-11-13T17:19:35+5:30
राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे
अहमदनगर - त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. सध्या या भागांमधील परिस्थिती नियंत्रणात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातील जनतेला शांतता आणि संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अपप्रचारला कुणीही बळू पडू नये, असेही ते म्हणाले.
राज्यातील तमाम जनतेला मी कर्जतमधील सभेतून आवाहन करतो की, आपल्या ईशान्य भारतात त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसांत दुर्दैवी घटना घडत आहेत. मात्र, तेथील या घटनांबद्दल आपण सर्वांनी संवेदनशील असलंच पाहिजे. आपण भारताचे नागरिक आहोत, परंतु तिथल्या हिंसाचाराचे पडसाद आपल्या शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात दिसणार नाहीत. इथल्या समता, बंधुतेला कुठलाही धक्का लागणार नाही, याची काळजी आपणा सर्वांना घ्यावीच लागेल, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्यात जातीय व धार्मिक सलोखा टिकवण्याचं काम आपणा सर्वांना करायचं आहे. त्यामध्ये, कायदा व सुव्यवस्था कायम ठेवायची आहे. अफवा आणि अपप्रचाराला कुणीही बळू पडू नका. राज्यातील तमाम जननेतं संयम बाळगावा, सावधगिरी बाळगावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या निधीतून सुरु असलेल्या कामांचं भूमिपूजन आणि उद्धाटन समारंभ आज पार पडला. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांना मिळून तब्बल २३० कोटी रुपयांचा निधी विकासकामांना मिळाला असून त्यातून ही कामे होणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) निशाणा साधला.
गृहमंत्र्यांनीही केलंय शांततेचं आवाहन
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, संयम बाळगावा असे कळकळीचे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीत आपण सगळ्यांनी सामाजिक ऐक्य राखणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी जनतेला केली आहे.