शेवगाव : पंचायत समितीतील कोरोना बधिता अधिकाऱ्याच्या जवळून संपर्कात आलेल्या अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान पंचायत समितीतीत येणाऱ्या लोकांच्या वर्दळीत लक्षणीय घट झाल्याचे पाहिला मिळते आहे.
'त्या' अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या कार्यालयातील नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांना अहमदनगर येथे घशातील स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील जवळून संपर्कात आलेल्या सहा व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उशिरा त्या सगळ्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचायत समिती मध्ये कामानिमित्ताने तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यात एक अधिकारी कोरोना बाधित सापडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. कामानिमित्ताने अनेक नागरिक, अहवाल निगेटिव्ह आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे अनेक नागरिकांची चिंता वाढली होती.
दरम्यान नगर परिषदने पंचायत समितीची इमारत निर्जंतुकीकरण केल्यावर प्रशासकीय दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू झाले असले तरीही नागरिकांनी कार्यलायाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. कार्यालयातील नेहमीची वर्दळ ओसारली आहे.