अहमदनगर : सध्याचे दूध स्वीकृतीचे फॅट व एसएनएफचे निकष रद्द करून निकष फॅट व प्रोटिन्सच्या नव्या निकषांवर दूध स्वीकृत केल्यास राज्यातील दूध भेसळ पूर्णपणे थांबेल, असा दावा दूधउत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे यांनी केले आहे.राज्यातील दूध धंदा उर्जितावस्थेत आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यात दूध भेसळ रोखण्याच्या उपाययोजनाही सुचविण्यात आल्या आहेत. दूध भेसळ प्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित केल्यास शेतकरी व ग्राहकांची होणारी लूट थांबून भेसळखोरांवर जरब बसेल, अशा कार्यवाहीची आवश्यकता आहे. यासाठी शासन प्रतिनिधी, महानगरपालिका, दुग्ध विकास मंडळ, पोलीस, अन्न सुरक्षा पथक व पत्रकार यांची दूध भेसळ तपासणीसाठी संयुक्त भरारी पथके नेमावीत, १० वर्षांपासून बंद झालेली नाका दूध तपासणी पुन्हा सुरू करावी, टोन्ड दुधामुळे ५० टक्के दूध ग्राहक कमी झाले आहेत. हे दूध पोषक नसल्यामुळे ग्राहक त्याचा आहारात वापर करीत नाहीत. त्यासाठी गाईच्या दुधाचा एकच ब्रँड ठेवला पाहिजे. याबाबत केंद्र सरकारने टोन्ड दुधाच्या कायद्यात केलेला बदल अभिनंदनीय आहे. केंद्राने दूध स्वीकृतीच्या व विक्रीच्या नियमात केलेल्या बदलामुळे शेतकरी व ग्राहक या दोघांनाही दिलासा मिळणार आहे.सध्या बाजारपेठेत सुमारे ३५० दूध विक्री करणारे ब्रँड आहेत. दूध विक्रेता स्वत:चा ब्रँड तयार करून दुधाची विक्री करतो. त्यामुळे चांगल्या प्रतिचे शुद्ध दूध मिळेल, याची खात्री नसते. त्यामुळे विविध प्रकारचे ब्रँड रद्द करून सरकारी अथवा सहकारी व खासगी असे दोनच ब्रँड ठेवल्यास ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध मिळून विक्रेत्यांवर बंधन येईल. सध्या वेगवेगळ्या ब्रँडसाठी वेगवेगळा दर द्यावा लागतो. दोनच ब्रँड ठेवल्यास ग्राहक व शेतकऱ्यांची लूट थांबून विक्रेत्यांचीही मनमानी थांबेल.सध्या गावागावांत खासगी संस्था घरोघरी जाऊन दूध संकलन करीत आहे. त्यामुळे फॅट, डीग्री न पाहता दूध संकलन करून मनमानी भाव देऊन शेतकºयांची लूट केली जात आहे. त्यासाठी संकलन केंद्रावरच दूध स्वीकारण्यासाठी ही केंद्रे पुन्हा सुरू करावीत. केंद्रामार्फतच दूध स्वीकारण्याची सक्ती करावी. गायीच्या दुधास ३६, तर म्हशीच्या दुधास प्रतिलिटर ४५ रुपये भाव देण्याची मागणी करून राज्याबाहेरील दुधास कर लावण्याची सूचना डेरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.