आॅनलाईन लोकमतअहमदनगर, दि़ २० - उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामुळे नगरमधील भाविक अडकल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे़ नगरमधून बद्रिनाथ दर्शनासाठी सुमारे ७४ भाविक गेले होते़ त्यातील अनेकांशी संपर्क तुटलेला आहे़ चमोली जिल्ह्यात सतत पाऊस पडत असून बद्रिनाथकडे जाणारे अनेक भाविक विष्णुप्रयागाजवळ अडकून पडले आहेत़ विष्णुप्रयागजवळ हाथीपहाड येथे भूस्खलनानंतर हा महामार्ग पूर्ण बंद झाला आहे. या रस्त्याचा ५० मीटर भाग खचला आहे. प्रशासनाने भाविकांना रस्त्यातच रोखले आहे. हाथीपहाडच्या दोन्ही बाजंूना ५०० हून अधिक वाहने अडकली आहेत. बद्रिनाथकडे जाणाऱ्या भाविकांना जोशी मठ, पीपलकोटी, चमोली येथे थांबविण्यात आले आहे. बद्रिनाथच्या बाजूने अडकलेल्या यात्रेकरूंसाठी गोविंदघाट गुरुद्वारा येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.कोपरगाव येथील सचिन वैद्य यांचे आई, वडिल व चुलते, नगरमधील सुभाष कराळे यांचे भाऊ, भावजई यांच्यासह आठजण टवेरा कारमधून केदारनाथला दर्शनासाठी गेले आहेत़ परवा त्यांच्याशी सुभाष कराळे यांचा संपर्क झाला होता़ मात्र, कालपासून संपर्क होत नसल्याचे सुभाष कराळे यांनी सांगितले़ शिंगणापूर येथून ट्रॅव्हल्समधून ४० भाविक बद्रिनाथच्या दर्शनासाठी गेले आहेत़ त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती योगेंद्र शिंदे यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविली आहे़ याशिवाय श्रीगोंदा येथील २३ जण गेल्याचे सांगण्यात येत आहे़
बद्रिनाथ येथे भूस्खलनात नगरचे भाविक अडकले
By admin | Published: May 20, 2017 1:19 PM