राहुरी : महाराष्ट्रदिनी होणाऱ्या ग्रामसभेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव करुन तो स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी बजावला आहे़ त्यामुळे रविवारी किती ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याचा ठराव करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला आठ वर्ष पूर्ण झाले आहेत़ महाराष्ट्रदिनी ग्रामसभा घेणे प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधनकारक करण्यात आले आहे़ त्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या विषयपत्रिकेत गाव तंटामुक्त झाल्याचा ठराव पारीत करण्याचा विषय घ्यावा व तसा ठराव करुन तो २ मे रोजी तंटामुक्त गाव मोहिमेचे अध्यक्ष व निमंत्रक यांच्या स्वाक्षरीने स्थानिक पोलीस स्टेशनला पाठविण्यात यावा, असा आदेश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे़तत्कालीन गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांच्या संकल्पनेतून महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राज्यात सुरू झाले़ या योजनेतून राज्यातील हजारो गावे तंटामुक्त झाले़ या अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील ७९० गावे तंटामुक्त झाले आहेत़ गावांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी गावातील वाद स्थानिक पातळीवर मिटावेत म्हणून अभियान सुरू करण्यात आले़ मोहिमेत सहभागी झालेल्या गावांनी ग्रामसभा घेऊन गाव तंटामुक्त झाल्याचे घोषित करणारा अहवाल पाठविण्यास या आदेशाद्वारे सांगण्यात आले आहे़ मात्र, ठराव घेणाऱ्या गावांमध्ये तंटामुक्ती झाली किंवा नाही, याची पडताळणी कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे़(तालुका प्रतिनिधी)
आजच्या ग्रामसभेत होणार ‘तंटामुक्ती’चा ठराव
By admin | Published: May 01, 2016 1:36 AM