अहमदनगर : येथील सायकलपटू शरद काळे, उदय टिमकरे व शशिकांत आवारे हे तिघे शनिवारी माउंट एव्हरेस्टच्या उंचीइतकी सायकल चालवून विक्रम करणार आहेत. पांढरीचा पूल येथील घाट ते सलग ७२ वेळा चढउतर करणार आहेत. त्यासाठी सलग ३० तास सायकल चालविण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
औरंगाबाद रोडवरील पांढरीच्या पुलाच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरापासून सायकल चालविण्यास हे प्रारंभ करणार आहेत. जगातील सर्वात मोठे आव्हान हे या तीन सायकलस्वारांनी स्वीकारले आहे. जगात सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर आहे. या शिखराची उंची ८८४८ मीटर (२९०२९ फूट) आहे. सायकलस्वाराने हे अंतर एखाद्या टेकडी अथवा डोंगरावर वर-खाली करून तितकी उंची गाठायची आहे. हे पूर्ण केल्यास त्यांचे नाव हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट केले जाते.
पांढरीच्या पुलाची पायथ्यापासूनची उंची १२५ मीटर आहे. त्यामुळे हे सायकलस्वारांना आठ हजार ९०० मीटरचे अंतर गाठण्यासाठी ७२ वेळा घाट चढउतर करावी लागेल. त्यासाठी अंदाजे ३० तास लागतील. विशेष म्हणजे सायकलस्वाराने मध्ये कुठेही विश्रांती घेता कामा नये, अशी अट आहे.
जगातील १५,६३३ स्पर्धकांनी हे आव्हान पूर्ण केले आहे. भारतातील १४४ स्पर्धकांनी हे आव्हान पूर्ण केले असून, यामध्ये १२८ पुरुष, तर १६ महिला आहे.