महामार्ग आणि उपनगरातील काही अपवादात्मक ठिकाणे सोडता रस्त्यावर कुठेच नागरिकांची वर्दळ दिसून आली नाही. अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. गेल्या काही दिवसांत नगर शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सर्वांनीच या महामारीची धास्ती घेतली आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडण्याचे नागरिक स्वतःहून टाळत आहेत. शनिवारपासून तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त रविवारीही कायम होता. पोलिसांनी शहरासह महामार्गावर वाहनांची तपासणी केली. अत्यावश्यक काम असलेल्या नागरिकांवर कुठल्याही स्वरूपाची कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आले. शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ही संचारबंदी कायम राहाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिल्याने नागरिकांनी घराबाहेर येण्याची टाळले.
.............
पोलिसांना लाठीची गरज भासलीच नाही
मागील वर्षी संचारबंदी व लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलिसांनी लाठी-काठ्यांचा चांगलाच प्रसाद दिला होता. पोलिसांच्या या फटकेबाजीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळेस मात्र निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीचे गांभीर्य नागरिकांनी ओळखले आहे. नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण कमी झाल्याने यंदा पोलिसांना काठी उगारण्याची गरज भासत नाही.
...........
दंडाची धास्ती
नियमांचे उल्लंघन करून दुकान उघडणे, मंगल कार्यालयात गर्दी करणे, मास्क न लावणे, रस्त्यावर थुंकणे आदी नियमांचा भंग करणाऱ्यांवर पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाभरात कारवाई करत मोठ्या रकमेचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी दंडाची धास्ती घेत गुपचूप नियम पाळणे पसंत केले आहे.