जागतिक पर्यटन दिन विशेष
अहमदनगर : लॉकडाऊननंतर देशांतर्गत व काही विदेशातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. पर्यटन कंपन्यांमार्फत आकर्षक सवलतीही दिल्या जात आहेत. मात्र कोरोनाच्या भितीमुळे यंदा पर्यटक घर सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येण्यास अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे.
मार्चपासून भारतासह जगभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच ठिकाणची बससेवा, रेल्वे, विमानसेवा, हॉटेल व पर्यटन स्थळे बंद झाली होती. यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. काही ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने भारतासह विदेशातील काही पर्यटन स्थळे खुले करण्यात आले आहेत.
पर्यटन कंपन्यांनी बुकिंग घेण्यासही सुरुवात केली आहे. कोरोनाची भीती कायम असल्याने ग्रुप सहलीसाठी प्रतिसाद मिळत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा आॅगस्ट ते सप्टेंबरमध्ये दहा टक्के पर्यटकांनीही बुकिंग केले नसल्याचे पर्यटन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळीही शुकशुकाटजिल्ह्यातील शिर्डी, शिंगणापूर, मेहराबाद यासह इतर धार्मिकस्थळे व भंडारदरा, निघोज या पर्यटनस्थळावरही कोरोना महामारीचा मोठा परिणाम झाला आहे. भाविक व पर्यटक येत नसल्याने येथील आर्थिक उलाढाल गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प आहे.
देशांतर्गत व विदेशातील काही पर्यटनस्थळे खुली झाली आहेत. मात्र सध्या पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद नाही. गेल्या पाच ते सहा महिन्यात पर्यटनाशी निगडीत असलेल्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. - निलेश वैकर, संचालक पूजा इंटरनॅशनल थॉमस कूक
कोरोना महामारीचा पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाची भीती कायम आहे. नोकरी, व्यवसायिक कामानिमित्त लोक देश-विदेशात प्रवास करत आहेत. मात्र ग्रुप सहलीला अजून प्रतिसाद नाही. ही परिस्थिती मात्र येत्या काही दिवसात बदलेल, अशी अपेक्षा आहे. -किशोर मरकड, अध्यक्ष, टुरिझम फोरम