केडगाव : महसूल पथकावर वॉच ठेवून वाळुतस्करांना खबर देण्या-यांवर गुन्हा दाखल करुन बंदोबस्त करण्याची मागणी नगर तालुका महसूल अधिका-यांनी तोखाना पोलिस ठाण्याकडे केली आहे.राहुरीत पथकावर हल्ला झाल्यानंतर वाळूतस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिका-यांनी मागील महिन्यात मैदानात उतरुन विशेष मोहिम सुरु केली. मात्र, जिल्ह्यात वाळूमाफियाची दहशत कमी होण्याऐवजी दिवस-दिवस वाढत असल्याचे दोन दिवसातील घटनेवरुन पुन्हा समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महसूल विभागाला वाळूमाफियांनी टार्गेट केले असल्याचे यानिमित्तिाने समोर येत आहे. जिल्हाभर वाळूमाफियांनी उच्छांद मांडला असून बेकायदा वाळू चोरीचा सपाटा लावला आहे. रात्र-दिवस वाळूची वाहतूक करणा-या सर्वच वाहने पथकाच्या हाती लागणे शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरट्या मागार्ने वाळुउपसा सुरु आहे. दरम्यान काही प्रामाणिक अधिकारी आपले कर्तव्य बजावत असताना बेकायदा वाळू रोखण्याचा प्रयत्नात असताना वाळूतस्करांचे खबरे पथकावर वॉच ठेवून हेरगिरी करुन माहिती पुरवितात. त्यानुसार नदीपात्रातून निघणारे वाहने खाली होईपर्यत त्या मार्गावर खबरे कार्यरत असतात.नगर तालुक्यातील नायब तहसिलदारांचे स्वतंत्र दोन गौणखनिज पथके अनाधिकृत उपसा रोखण्यासाठी कार्यरत असताना रात्री पथकाचा पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आले. नगर- मनमाड रोडवर विळद, देहरे, नांदगाव, बायपासार्गे विश्रामगृह असा पाठलाग करण्यात आला. दरम्यान पथकाने त्यास हटकले असता त्याने माहिती पुरवित असल्याचे कबुल गेले. खब-याकडून आणखी माहिती घेतल्यास इतर माहिती समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी महसूल अधिकारी व कर्मचा-यांनी पोलिसांकडे केली. निवेदनावर नायब तहसिलदार अर्चना पागिरे, वैशाली आव्हाड, मंडळअधिकारी दिपक कारखिले, राजेंद्र राऊत, रिजवान शेख, संतोष झाडे, आदीसह तालुक्यातील तलाठी कामगारांचे नावे आहेत.
महसूल पथकावर खब-यांचा वॉच : नगर तालुका महसुलची पोलिसांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 3:51 PM