अहमदनगर: राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळ पॅनलचा दारुण पराभव झाला. १९ पैकी १८ जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची आघाडी कायम आहे.
कारखान्याच्या १९ जागासाठी शनिवारी मतदान झाले होते. यामध्ये १९ पैकी १८ जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी सुरवातीपासूनच घेतलेली आघाडी कायम राखली आहे. केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसेच सर्व ताकद पणाला लावली होती. तरीही फक्त एका जागेवरच विखे गटाचा उमेदवार निवडून आला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकत्रित पॅनल असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या पॅनलच्या उमेदवारांनी सर्वच गटात विजय मिळवला आहे. या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी विवेक कोल्हे यांना साथ दिली होती. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनीही राहत्यामध्ये सभा घेऊन विखे पाटील यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती.