सोनई : शिर्डी व शनि शिंगणापूर येथे दोन चांगले अधिकारी देण्यात येतील. शनी भक्तांना त्रास देणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. याबाबत अत्यंत कठोर पावले उचलून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी दिला.पोलीस प्रमुख पदाची सूत्रे घेतल्यानंतर लखमी गौतम यांनी शिंगणापूरला भेट देऊन अभिषेक केला. त्यानंतर मंदिर परिसरात फिरून सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. ९५ कॅमेरे असलेल्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमला भेट देऊन या व्यवस्थेचीही त्यांनी पाहणी केली. व देवस्थानचे सुरक्षा रक्षक व सोनई पोलिसांना त्याबाबतच्या सूचना दिल्या. जागोजागी आतंकविरोधी फलक लावण्याचे आदेश देऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. गणपती विसर्जनानंतर येथे येऊन पोलीस अधिकारी, देवस्थान विश्वस्त व खासगी दुकानदार यांची संयुक्त बैठक घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले.शनैश्वर देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले यांनी देवस्थान राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात अध्यक्ष शिवाजीराव दरंदले, सोपानराव बानकर यांनी लखमी गौतम यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना लखमी गौतम म्हणाले, मी यापूर्वी २००८ साली शनी दर्शनासाठी आलो होतो. परंतु त्यावेळची परिस्थिती व आजची परिस्थिती यामध्ये खूप बदल झालेला आहे. देवस्थानने शनी भक्तांसाठी अत्यंत चांगले उपक्रम राबवून प्रगती केली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विश्वस्त हजर होते. (वार्ताहर)
शिंगणापुरच्या सुरक्षेचा आढावा
By admin | Published: August 30, 2014 11:12 PM