मढेवडगाव : श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे शिवारात समाजकंटकांनी ६ फेब्रुवारीस फोडलेला घोड कालव्याची तब्बल २२ दिवसांनी दुरूस्ती पूर्ण झाली आहे. त्यामुळे आवर्तनाचा मार्ग मोकळा होताच गुरूवारी घोड धरणातून सायंकाळी पुन्हा आवर्तन सोडण्यात आले.घोड धरणाचे आवर्तन सुरू असतानाच काही समाजकंटकांनी चिंभळे शिवारात घोड नदीवरील इनामगाव हद्दीतील नलगे मळ्याजवळील बंधारा भरण्याच्या उद्देशाने घोडचा मुख्य कालवा ६ फेब्रुवारीस रात्री फोडला होता. त्यामुळे जवळपास २० दशलक्ष घनफूट पाण्याची नासाडी झाली. अखेर २२ दिवसांनी कालवा दुरूस्ती झाली. जवळपास १६ लाख रूपये खर्च आला. ही दुरूस्ती सिंचन विभागाच्या यांत्रिकीकरण विभागाने केली.गुन्हा दाखल होऊनही कालवा फोडणारे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत. बेलवंडी पोलिसांनी पंचनामा केला. परंतु पुढे काहीच कारवाई केली नाही. याबाबत त्यांना वारंवार विचारले असता तपास सुरू असल्याचे उत्तर मिळत आहे. उपवितरिका १४,१७,२०,२१ वरील जवळपास १ हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांचे भरणे रखडले आहे. त्या शेतकऱ्यांची पाण्याविना बिकट अवस्था झाली आहे. गुरूवारी सायंकाळी घोड धरणात ४७७.४७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणी साठा होता. पूर्ण आवर्तनासाठी एक टीएमसी पाणी लागते. त्यामुळे पुढील उन्हाळी आवर्तन संपल्यातच जमा आहे....दुरूस्तीसाठी अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरीसाठी वेळ लागला. राहिलेले अर्धा टीएमसी पाणी एक दोन दिवसात निर्णय घेऊन सोडणार आहे. लाभधारकांनी दुष्काळी परिस्थिती पाहून सहकार्य करावे. राहिलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करू. आवर्तन सुटल्यावर भरारी पथक व पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. - प्रकाश लंकेश्वर, उपविभागीय अधिकारी, घोड पाटबंधारे विभाग क्रमांक २, मढेवडगाव.