संजय सुपेकर । बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील बोधेगावपासून अगदी जवळच असलेल्या श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान व सोनदरी डोंगर परिसर फुलला आहे. येथील डोंगरातून उंच कड्यावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडत आहेत. पशुपक्ष्यांची किलबिल व खळखळून वाहणारे झरे मन मोहून टाकतात. बोधेगाव (ता. शेवगाव) येथून पंधरा किलोमीटर अंतरावर नागलवाडी, गोळेगाव परिसरात वाल्मिकी ऋषी व राम-सीतेचा अधिवास लाभलेले श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थान आहे. या परिसराला पौराणिक, ऐतिहासिकही महत्त्व आहे. रामायणात या ठिकाणचा ‘दंडकारण्य’ म्हणून उल्लेख आढळून येतो. हिरवाईने नटलेला सोनदरी डोंगर पर्यटकांच्या स्वागतासाठी आसुसलेला दिसून येतो. येथील डोंगरातून उंच कड्यावरून कोसळणारे नयनरम्य धबधबे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडत आहेत. पशुपक्ष्यांची किलबिल व खळखळून वाहणारे झरे मन मोहून टाकतात. डोंगराच्या मधोमध असणारा पाण्याने तुडुंब भरलेला गोळेगावचा तलावही पर्यटकांना आकर्षित करतो. डोंगरावरून धबधब्याकडे खाली उतरण्यासाठी फार वर्षांपूर्वी पायºया असणारा पूल बांधलेला आहे. येथील डोंगर रांगेत हिरडा, बेहडा, अर्जुन सौताडा, गुळवेल, गुंज, चंदन सौताडा आदी गुणकारी वनऔषधी आढळतात. मोर, ससा, हरिण, काळवीट असे वन्यजीव मोठ्या प्रमाणात नजरेस पडतात. येथील सोनदरी डोंगरात महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक चक्रधर स्वामींचे वास्तव्य होते. त्यामुळे या ठिकाणी महानुभाव पंथाचे प्रार्थनास्थळ आहे. पंथाचे अनुयायी येथे विविध सणानिमित्त दीपोत्सव करतात. सध्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पर्यटक येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. असा पर्यटकांना आकर्षित करणारा समृद्ध निसर्ग केवळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित न झाल्याने दुर्लक्षित आहे. यामुळे येथील पर्यटनस्थळ विकासाला चालना देण्याची गरज आहे, अशी अपेक्षा निर्सगप्रेमी डॉ. सतीश चव्हाण, प्रवीण भराट, प्रा. राहुल भोंगळे, अमोल कमाने, संजय वारकड, खंडू शिंदे, मयूर हुंडेकरी, राज शेख आदींनी व्यक्त केली आहे.येथील परिसर नयनरम्य निसर्ग, पाण्याचे झरे, धबधबे, वनौषधी, विविध वन्यजीव आदी नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहे. मात्र राजकीय अनास्थेमुळे हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ न शकल्याने अद्यापपर्यंत दुर्लक्षित आहे. सध्या सुरू असलेल्या भगवानगड ते बोधेगाव या देवभूमीच्या रस्त्यामुळे हा परिसर नावारूपाला येईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे निसर्गप्रेमी डॉ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.
बोधेगावजवळील सोनदरी डोंगरातील ‘समृद्ध निसर्ग’ फुलला; धबधब्याकडे पर्यटकांची रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 2:05 PM