निघोज : सततच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीने शेती मशागतही महागली आहे. तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे नियोजनही कोलमडले आहे. त्यामुळे इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे.
डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांसह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसतो. शेतातील नांगरणी, पेरणी, रोटा मारणे, इतर मशागतीच्या कामांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. तसेच शेतमाल वाहतुकीच्या भाड्यातही वाढ होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी प्रचंड खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे निश्चितच प्रत्येक ठिकाणी होणारा खर्च व उत्पादनावर होणारा नफा यामध्ये मोठी तफावत राहणार नाही. यामध्ये ताळमेळ बसविणे शेतकऱ्यांना अवघड होत आहे.
घरगुती गॅसचे भावही प्रचंड वाढल्यामुळे शेतकरी महिलांनाही चुलीची आठवण होत आहे; परंतु त्यासाठी लागणारे सरपणही शेताच्या बाजूची झाडे तोडल्यामुळे उपलब्ध होणे अवघड आहे. त्यामुळे गॅसचे वाढलेले दर कमी होणे गरजेचे असल्याची भावना गृहिणी बोलून दाखवत आहेत.
---
आमच्याकडे शेतीची मशागत करण्यासाठी दोन ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देण्यासाठी आहे. या सहा महिन्यांसाठी डिझेलचे भाव प्रचंड वाढल्यामुळे आम्हालाही शेती नांगरणे, रोटर मारणे, आदी कामांसाठी भाववाढ करावी लागत आहे.
-सुनील ढवळे,
ट्रॅक्टरचालक
---
डिझेल भाववाढीमुळे यंत्राच्या साहाय्याने शेती मशागत करण्यासाठी प्रचंड खर्च येत आहे. परंतु, बैलजोडी अनेक शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे ट्रॅक्टरशिवाय पर्याय नाही.
-दत्तात्रय लंके,
शेतकरी