श्रीरामपूर : नगर जिल्ह्यातील सुमारे १५० ट्रान्सपोर्ट कंपन्या डिझेल दरवाढीमुळे कोलमडण्याच्या परिस्थितीत आल्या आहेत. ही दरवाढ आणखी पाच रुपयांवर गेल्यास ५० टक्के व्यावसायिक या उद्योगातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हजारो कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.
नगर शहरानंतर श्रीरामपुरात ट्रान्सपोर्ट कंपन्यांची संख्या मोठी आहे. येथे १५ ते २० कंपन्या असून त्यांच्याकडे १५० च्या आसपास ट्रक आहेत. जिल्ह्यातून प्रामुख्याने साखर, कांदा, सोयाबीन, मका व गव्हाची देशभरात वाहतूक केली जाते. सध्या साखरेची वाहतूक राज्यातच केली जात असून कांद्याचा कर्नाटक व तामीळनाडू या राज्यात पुरवठा केला जातो. सोयाबीनची वाहतूक धुळे जिल्ह्यातील तेल कंपन्यांना होते.
गेल्या चार वर्षात डिझेलमध्ये ६० रुपयांपासून ८५ रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे. त्या तुलनेत ट्रान्सपोर्ट उद्योगांना भाडेवाड मिळालेली नाही. त्यामुळे सध्या हा उद्योग ना नफा ना तोटा या तत्त्वावरच सुरू असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. प्रारंभी कोरोनामुळे दोन ते तीन महिने गाड्या बंद राहिल्या होत्या. आता लॉकडाऊन शिथिल झाला तर डिझेल दरवाढीमुळे पुन्हा वाहने बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आणखी दरवाढ झाल्यास या उद्योगातून बाहेर पडावे लागेल, अशी भीती व्यावसायिकांनी बोलून दाखविली.
चालक, क्लिनरपासून बँका, खासगी फायनान्स कंपन्या या सर्वांनाच इंधन दरवाढीमुळे दुष्टचक्राचा सामना करावा लागत आहे.
-----------
असा बसला फटका
श्रीरामपूर ते गुजरात : अंतर ४०० किलोमीटर
१२ टायर ट्रक माल वाहतूक : २५ टन माल
साखरेकरिता मिळणारा दर : ८०० रुपये टन
एकूण भाडे : २० हजार रुपये.
...
येणारा खर्च
डिझेल : १३,६०० हमाली : ४५०० : चालक भत्ता व टोल : १०००.
-------------
सरकारने डिझेल दरवाढ तातडीने मागे घ्यावी अन्यथा शेतकऱ्यानंतर ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू होईल. बँकांचे कर्जाचे हप्ते थकले आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगाराला पैसे शिल्लक राहत नाहीत, अशी भीषण स्थिती आहे.
-विपूल कोटक, न्यू स्वस्तिक रोडवेज, श्रीरामपूर.
---------