लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी : ऐन खरिपाच्या तोंडावर उत्पादक कंपन्यांनी खताच्या दरवाढीचा झटका दिला. या स्थितीत जुना साठा, जुन्या दरातच विकला जाणार, असे कंपन्या व कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. तरी प्रत्यक्षात मात्र साठेबाज या साठ्यांचा शेतकऱ्यांना ताळमेळ लागू देतील का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दरवर्षी खरीपपूर्व नियोजन करत खतांची मागणी नोंदवली जाते. यंदा याच काळात काही कंपन्यांची जवळपास ५० ते ६० टक्के दरवाढ असलेली कार्यालयीन पत्रके सोशल माध्यमांवर फिरली. यानुसार सर्वाधिक वापर असलेल्या डाय अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपी, एनपीके आदी विविध गटांतील खताच्या किमती शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यात आहेत. याविषयी ओरड सुरू झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ही दरवाढ नसल्याचे तर कंपन्यांनी ही दरवाढ केवळ नव्या खतासाठी असल्याचे सांगितले होते. यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला. केंद्र सरकारने किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी खतांच्या अनुदानातही नंतर वाढ केली खरी; पण यामुळे जुने खत नव्या दराने माथी मारण्याचा धोका वाढला आहे. राहाता तालुक्यात खरीप हंगामाचे क्षेत्र ३५ हजार हेक्टर असून सरासरी पर्जन्यमान ४९९ मिलिमीटर आहे.
तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीन, मका, बाजरी, ऊस, फळबागा, चारा पिके घेतली जातात. तालुक्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच खरिपाच्या नियमित पिकांची मागणी गृहीत धरली तर खतांच्या मागणीत काही प्रमाणात वाढ अपेक्षित आहे. यातच जुने खत नव्या दराने माथी मारण्याचा धोका वाढला आहे. शिवाय साठेबाजी, शॉर्टेज यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होण्याची शक्यता आहे.
राहाता तालुक्यासाठी आगामी खरीप हंगामात खरीप २०२१ साठी ९ हजार ८५० मेट्रिक टन आवंटन मंजूर आहे. खतांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ४०० मेट्रिक टन युरिया बफर स्टॉक म्हणून तालुक्यात संग्रही करून ठेवला आहे. यातील १ एप्रिल पूर्वीचे खत किती व नंतरचे खत किती, विक्रेत्याकडे जुने खत किती आहे. सध्या कोणत्या व्यापाऱ्याकडे किती खत आहे, याची अपडेट माहिती मिळू शकली नाही. यामुळे जुना साठा कोणाकडे किती आहे, याची जाहीर प्रसिद्धी करणे आवश्यक आहे. खत विक्रीत पारदर्शकता यावी.
.............................
गोणीवरील किंमत पाहा, पॉसची पावती घ्या...
• जुन्या अन् नव्या दरात मोठी तफावत असल्याने याचा स्वत:च्या साठ्यातील मास्टर फायदा घेऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांची लूट होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना गोणीवरील छापील किंमत पाहून, त्यानुसार रक्कम देऊन आणि पॉस मशीनवरील पावती घेऊनच खरेदी करणे आवश्यक आहे.
• दरवाढीच्या पार्श्वभूमीवर जुना साठा नाही म्हणणे किंवा जादा दराने विक्री करून बिल न देणे, सदर विक्री जवळच्या व्यक्तीच्या नावावर पॉस मशीनला खतवणे असे प्रकारही होऊ शकतात. यासाठी त्यांना स्वतःलाच सतर्क राहावे लागेल. अन्यथा फसवणूक झाली तरी दाद मागता येणार नाही.
• रासायनिक खतांच्या किमती केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार २० मे २०२१ पासून लागू करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे युरिया २६६ रुपये, डी.ए.पी. १२०० रुपये प्रति बॅग अशी किंमत निर्धारित केलेली आहे. एन.पी.के. खतांची किंमत साधारणतः १००० ते १३०० रुपयांपर्यंत आहे. खत पुरवठा करणाऱ्या प्रमुख कंपन्या इफको, आरसीएफ, झुआरी, आयपीएल या आहेत तर सिंगल सुपर फास्फेटची किंमत ३८० ते ४१० रुपये आहे.
............................
भरारी पथक गठित...
• तालुका कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकाचे कृषी अधिकारी हे सचिव आहेत. तसेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी व वजन मापे निरीक्षक सदस्य आहेत. काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी पथकाशी संपर्क साधावा. दोन भरारी पथके स्थापना केलेली आहेत. सर्व कृषी सेवा केंद्र चालक यांनी साठा व भावफलक विक्री केंद्राबाहेर लावणे बंधनकारक आहे. निर्धारित दरापेक्षा अधिक किमतीला खत विक्री करण्यात येऊ नये. तालुक्यात आतापर्यंत ३७ दुकानदाराची तपासणी करण्यात आलेली आहे.
- प्रवीण चोपडे, गुण नियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग, राहाता.
...................................