कर्जतमधील रास्तारोको सुरूच : आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम : पालकमंत्री फिरकलेच नाहीतकर्जत : कर्जत येथील दावल मालिक देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणा-या तौसिफ हमीम शेख यांचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांना कर्जतमध्ये सकाळी ११ वाजता सुरु केलेला रास्तारोको अजूनही सुरुच आहे. शेख यांचा मृतदेह कर्जतमध्ये आणण्यात आला आहे. परंतु संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून पुर्णपणे अतिक्रमणे काढण्याच्या भुमिकेवर ते ठाम आहेत. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना व अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया दाखल झाले आहेत. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील घटना असूनही ते अद्याप कर्जतकडे फिरकलेच नाहीत. पालकमंत्री राम शिंदे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा. शहीद तौसीफ शेख याला न्याय मिळावा. पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह पोलिस अधीक्षक आणि तालुका प्रशासन यांच्यावर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. कुटुंबियासाठी १ कोटी रूपयांची मदत आणि नातेवाईकाला सरकारी नोकरी देण्यात यावी. दावल मलिक ट्रस्टच्या जागेतील अनाधिकृत सर्व अतिक्रमण तात्काळ काढावे. मागण्यांबाबत ठोस कारवाई होइपर्यंत शहीद तौसीफ शेख यांचे दफन करण्यात येणार नाही, अशी एकमुखी मागणी रास्तारोको आंदोलनादरम्यान करण्यात आली असून अजूनही रास्ता-रोको आंदोलन सुरुच आहे. कर्जत शहरातील पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविली जावीत या मागणीसाठी तौसिफ हमीम शेख यांनी काल दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतले होते. शेख हे ८० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र गुरुवारी मध्यरात्रीच प्रकृती गंभीर झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अद्यापही पालकमंत्री राम शिंदे फिरकलेच नाहीत..जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील ही घटना असूनही अद्यापपर्यत त्यांनी घटनास्थळी धाव घेतलेली नाही. सकाळपासून आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम असूनही प्रशासनानेही दखल घेतलेली नाही.
अतिक्रमणे हटविली नावापुरतीच...सकाळी सुरु झालेल्या रास्तारोकोेनंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास प्रशासनाने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. ५० टक्के अतिक्रमणे प्रशासनाने हटविली. मात्र पक्की बांधकामे हटविण्यास प्रशासन धजावले नाही. हे अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनावर दबाव असल्याचे बोलले जात आहे. सर्व अतिक्रमणे जोपर्यत हटविण्यात येत नाहीत, तोपर्यत रास्तारोको सुरुच ठेवण्याच्या भुमिकेवर आंदोलक ठाम आहेत.