कर्जत : विविध मागण्यांसाठी कर्जतमध्ये वृद्ध, भूमिहीन शेतमजूर संघटना, जेष्ठ नागरीक संघटनेच्यावतीने नगर-बारामती रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसिलदारांना निवेदन दिले.संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचे मानधन तीन हजार रुपये करावे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गरजूंना तात्काळ गॅस उपलब्ध करून द्यावे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेअंतर्गत लाभार्थींना लाभ मिळावा. यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको करून मोर्चा काढण्यात आला होता.शब्बीरभाई पठाण म्हणाले, शासनाच्या विविध योजना गरीब आणि वंचित घटकासाठी असतात. त्यांचा लाभ, न्याय, हक्क त्यांना मिळालाच पाहिजे. प्रशासनातील अधिका-यांनी त्यांची योग्य अमलबजावणी करून वंचितांना लाभ मिळून दिला पाहिजे. यावेळी मोर्चातील सामान्य आंदोलकांनी स्वस्त धान्य दुकानातील बायोमेट्रिक मशीनबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या. अनेक वयोवृद्धाचे अंगठे या यंत्रावर उमतट नसल्याने आम्हा गरीबांना धान्य दुकानदार धान्यापासून वंचित ठेवतात अशा भावना व्यक्त केल्या. तहसिलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली. तहसिलदार किरण सावंत यांनी निवेदन स्वीकार करुन मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. आपल्या मागण्या शासनाला पोहचविल्या जातील. सध्या तालुक्यातील १२ हजार लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ८० लाख रुपये मानधन महिन्याला वाटप केले जात आहे. नियम व अटीच्या अधीन राहून सर्व वंचित गरजूंना लाभ मिळवून दिला जाईल.यावेळी संघटनेचे अध्यक्ष शब्बीरभाई पठाण, सय्यद काटेमाप, सोमनाथ भैलुमे, गोदड समुद्र, शोभा पवार, सुवर्णा धाकतोडे, सविता सुद्रिक आदींची भाषणे झाली.
कर्जतमध्ये विविध मागण्यांसाठी रास्ता-रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 5:10 PM