लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव शहरातील रेव्हिन्यू कॉलनी परिसरातील लोकवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना या रस्त्यावरून रहदारी करताना मोठी अडचण निर्माण होत असून गैरसोय होत आहे. या संदर्भात कोपरगाव नगरपरिषदेकडे वारंवार पत्रव्यहार करूनही त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी याच लोकवस्तीतील रहिवासी दिगंबर कोपरे यांनी थेट राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
कोपरे म्हणाले, कोपरगाव शहरातील रेव्हिन्यू कॉलनीलगतच्या लोकवस्तीसाठी असलेला रस्ता रेव्हिन्यू कॉलनीतील लोकांनी पत्रे लावून बंद केला आहे. त्यावर कोपरगाव नगरपरिषदेने पर्यायी रस्ता तयार करून दिला आहे. मात्र, या रस्त्यावर काही नागरिकांनी थेट रस्त्यालगत अतिक्रमण केले आहे. त्याचा सार्वजनिक रहदारीला अडथळा होत आहे.
नगरपरिषदेने संबंधित अतिक्रमण धारकांना २५ नोव्हेंबरला नोटीस देऊन ३० दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. केलेले अतिक्रमण काढले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. या नोटिसीला २५ डिसेंबरला एक महिना झाला आहे. तरीही संबंधितांनी अतिक्रमण काढलेले नाही. तसेच अतिक्रमण केलेल्या व्यक्तीकडे दोन दिवस लग्नाचा कार्यकम आहे. त्यांनी विनंती केल्याने काही काळ कारवाई थांबविली होती. ५ जानेवारी २०२१ नंतर ते स्वत:हून अतिक्रमण काढणार होते. संबंधितानी अतिक्रमण काढलेच नाही तर नगरपरिषद प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल असेही मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी म्हटले होते. परंतु, अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे नगरपरिषदेकडून आपण केलेल्या सार्वजनिक हिताच्या मागणीला प्रतिसाद दिला जात नसल्याने, शेवटी न्याय मिळेल या आशेने मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे, असेही कोपरे यांनी शेवटी म्हटले आहे.