पारनेर : तालुक्यात विजय सप्तपदी अभियानांतर्गत तराळवाडी-पुणेवाडी येथील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेला रस्ता १४३ प्रमाणे तहसीलदार ज्योती देवरे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून खुला केला. हा रस्ता अनेक वर्षांपासून बंद होता.
सप्तपदी मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात शेतात जाण्यासाठी रस्ते खुले करून देण्याची मोहीम तहसीलदारांनी सुरू केली आहे. तराळवाडी येथील भाऊसाहेब बबन शेरकर व पुणेवाडी येथील पांडुरंग नारायण रेपाळे या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बांधावरून रस्ता खुला करून देण्यात आला. हे शेतकरी अनेक वर्षांपासून रस्त्याच्या समस्यांशी झगडत होते. धान्य व शेतमाल पिकविल्यानंतर डोक्यावर कसरत करून शेताबाहेर काढावे लागत होते. अखेर शेतात जाण्यासाठी रस्ता मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
तालुक्यात अनेक गावांमध्ये शेतरस्त्याच्या अडचणी आहेत. सप्तपदी मोहिमेंतर्गत यासाठी तहसील कार्यालयामध्ये अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात यावा, यासाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार देवरे यांनी ३१ मार्चपर्यंत प्राप्त झालेल्या सर्व रस्ता तक्रारी निकाली काढल्या जातील, असे शेतकऱ्यांना सांगितले आहे. या पथकामध्ये पारनेर मंडलाधिकारी सचिन पोटे, पल्लवी गवळी, प्रेरणा काळे, सौरभ आवटे, दिगंबर पवार, तलाठी अशोक लांडे, पोलीस कर्मचारी मोरे आदींचा समावेश होता.
-----
२७ पारनेर शिवरस्ता
सप्तपदी मोहिमेंतर्गत पुणेवाडी येथील पांडुरंग नारायण रेपाळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बांधावरून रस्ता खुला करून देताना तहसीलदार ज्योती देवरे.