तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील नान्नजदुमाला येथे मोठेबाबा वाडीकडे जाणारा रस्ता काही व्यक्तींनी रात्रीच्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केला. सार्वजनिक रस्ता पूर्ववत करावा, या मागणीसाठी संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी (दि. २१ ) सकाळी ९ वाजता लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर नान्नजदुमाला येथे रास्ता रोको आंदोलन छेडले.
एक तास सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक रस्ता पूर्ववत केल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
नान्नजदुमाला येथील लोणी - नांदूरशिंगोटे रस्ता ते मोठेबाबा वाडीकडे जाणारा रस्ता काही व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास जेसीबीच्या सहाय्याने खोदून बंद केला, तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी चर मारले. त्यामुळे मोठेबाबावाडी व चत्तर वस्ती याठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांची मोठी गैरसोय झाली होती. याबाबत रहिवाशांनी तहसीलदारांना निवेदन देत तक्रार केली होती; मात्र तक्रारीची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी सार्वजनिक रस्ता पूर्ववत करावा, या मागणीसाठी शुक्रवारी (दि. २१ ) सकाळी ९ वाजता लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर नान्नजदुमाला येथे सरपंच भीमराज चत्तर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनात दिनकर चत्तर, कैलास चत्तर, भानुदास चत्तर, खंडू चत्तर, शंकर चत्तर, संजय चत्तर, सुनील चत्तर, किसन चत्तर, अनिल चत्तर, सोमनाथ चत्तर, पंढरीनाथ चत्तर, पांडुरंग चत्तर, समाधान चत्तर, सौरभ चत्तर, मनोज चत्तर, भाऊसाहेब चत्तर, राजू चत्तर, अशोक चत्तर, सुखदेव चत्तर सहित रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला घेतले. मंडलाधिकारी कामगार तलाठी अमोल गडाख यांनी सदर सार्वजनिक रस्ता सुरळीत करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर तातडीने खोदलेला रस्ता बुजवून सुरळीत करण्यात आल्याने आंदोलक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.
.