कोपरगाव : कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक नजीकच्या काळात होणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. गेल्या आठवड्यात कोपरगाव नगर परिषदेने मुरमाच्या सहायाने खड्डे बुजवले होते. त्याचा मनसेच्या वतीने शेणाचा सडा टाकून निषेध केला होता. आता याच मुरमाचा चिखल होऊन रस्त्याची घसरगुंडी झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील डांबरी रस्त्यावरील खड्ड्यांची मुरमाच्या साह्याने शनिवारी (दि. ११) पुन्हा दुरुस्ती केली होती. मात्र, दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे या सर्व मुरमाचा चिखल होऊन रस्त्याची घसरगुंडी झाली आहे. यावरून प्रवास करताना नागरिकांची चांगलीच फरपट होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील चिखल बाजूला सारून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून कोपरगाव शहरातील कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी २८ कामांना विरोध केल्यानेच शहरातील रस्त्यांची कामे रखडल्याचे विरोधक सांगत आहेत. त्यामुळे कोल्हे गटाचा निषेध म्हणून शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील काही डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले. त्यांचा उद्देशही चांगला असेल. मात्र, मुरूम टाकल्यानंतर झालेल्या पावसाने या सर्व मुरमाचा चिखल झाला आहे. त्यामुळे सोमवारी या रस्त्यावरून प्रवास करताना वयोवृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले, दुचाकी चालक, इतर वाहनधारक यांना या चिखलमय रस्त्यावरून वाट काढताना चांगलीच कसरत करावी लागली. काही जणांवर पाय घसरून चिखलात पडण्याची नामुष्की देखील ओढवली होती.
.............
शहरातील खड्डे बुजविताना काही ठिकाणी बारीक मुरूम पडल्याने चिखल झाला असेल, अशा ठिकाणी जाड मुरूम टाकून गैरसोय दूर करण्यात येईल.
-शांताराम गोसावी, मुख्याधिकारी, नगर परिषद, कोपरगाव
..............
फोटो ओळी
कोपरगाव शहरातील रस्त्यावरील मुरमाचा चिखल झाल्याने घसरगुंडी झाली होती.
..............