अहमदनगर : शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ते राहिले नसल्याने पाणंद रस्ते खुले करण्याचे प्रशासनाचे धोरण असून, आता रोजगार हमीतून पाणंद रस्त्यांची कामे होणार आहेत. यासाठी मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ता योजनेंतर्गत ग्रामपंचायत विभागाकडून ३५८ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे, तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी व इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येतात. परंतु, क्षेत्रवाटपामुळे शेती लहान झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी शेतात जाण्यासाठी रस्तेच राहिलेले नाहीत. त्यामुळे मशागतीसाठी यंत्रसामग्री शेतात कशी न्यायची किंवा शेतीमाल बाजारात पोहोचविण्याकरिता वाहने शेतात कशी न्यायची, हा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मातोश्री ग्राम समृद्धी शेत/पाणंद रस्त्याची कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये प्रति किलोमीटर २४ लाखांचे अनुदान अकुशल (मजुरीच्या स्वरूपात) व कुशल अशा प्रकारात शासन स्तरावरून कामानुसार उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या ४०२ कामांपैकी ३५८ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा स्तरावरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घेऊन कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणेस सूचना दिल्या. त्यानंतर सध्या जिल्ह्यामध्ये ३३ पाणंद रस्त्याची कामे सुरू झालेली आहेत.
कामे हाती घेत असताना कामांना प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर मजुरांची काम मागणी प्राप्त करून घेऊन रस्त्याची कामे सुरू करण्यात येतात. मंजूर झालेले सर्व पाणंद रस्ता कामे तत्काळ मजुरांची मागणी प्राप्त करून घेऊन सुरू करण्याबाबत सर्व तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना सूचित करण्यात आले आहे.
ही कामे आहेत प्रगतिपथावरजामखेड तालुक्यातील १४, कर्जत तालुक्यातील १२, नगर ३, तर पारनेर तालुक्यातील ४ तालुक्यांतील पाणंद रस्त्यांची कामे सध्या सुरू झालेली आहेत. तसेच ६ शेत/पाणंद रस्ते पूर्ण झालेले आहेत.